Friday, 27 December 2019

लतादिदी

आज २८ सप्टेंबर, लतादिदींना  ९१ व्या वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा!

मंगेशकर कुटुंबाने त्यात लतादिदीने त्यांच्या संगीत साधनेने ह्या विश्वावर अनंत उपकार केले आहेत. मराठी माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाला दिदींच्या आवाजाने मंतरलेले आहे. त्यांनी केलेल्या कोणत्या योगदान बद्दल लिहावे हा मोठा प्रश्न आहे. त्यांची गाणी येणाऱ्या १०० पिढ्यातील गायकांना पाठ्यक्रम म्हणून पुरेलच पण सामान्य माणसाला आनंद, प्रेरणा, आणि सुख देत राहतील. महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आणि मानबिंदू असणारे ज्ञानेश्वर महाराज, शिवाजी महाराज, वीर सावरकर असो किंवा महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेश असो ह्यांची गाणी म्हटली की फक्त दिदी आठवतात. मराठी माणूस अजून किती दिवस पसायदान म्हणजेच "आता विश्वात्मके देवे"(https://youtu.be/DQTKecWB9OM) गातांना दिदींनी गायलेल्या चाली वर गातील? गणपतीची आरती म्हणायची असेल तर "सुखकर्ता दुखहर्ता" (https://youtu.be/w0W8Wh-8UCg)  आणि "गजानना श्री गणराया" (https://youtu.be/fV8WIzEHD-E)  दिदींच्या चाली वर गात लोकांच्या मनात किती वर्षे भक्ती उत्पन्न करेल? शिवाजी महाराजांवरचे गीत "हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा" (https://youtu.be/aAsIi5FXB14) हे किती वर्षे युवकांना देशासाठी काही करण्याची प्रेरणा देईल? देशभक्तीने भारलेल्या सळसळणाऱ्या रक्ताच्या तरुणाला वीर सावरकरांची गाणी "जयोस्तुते श्री महन्मंगले" (https://youtu.be/xQrElx8-idM) किंवा "ने मजसी ने परत मातृभूमीला" (https://youtu.be/I4pJ0aD5RtA) अजून किती वर्षे मातृभू वर प्रेम करण्याची ताकत देईल? एका मराठी शाळेतील शिक्षिकेला मुलांना विश्वाची प्रार्थना सांगायची असल्यास "गगन सदन तेजोमय" (https://youtu.be/UmA-PAbTejE) हे गाणे अजून किती वर्षे सांगेल? ह्या प्रश्नाचे उत्तर कदाचित कोणाजवळ ही नाही. येणारे ४०० वर्षे किंवा ५०० वर्षे किंवा जो पर्यंत इतिहास ज्ञानेश्वर महाराज, शिवाजी महाराज, आणि वीर सावरकरांना आठवेल तो पर्यंत मराठी माणूस दिदींचे गाणे विसरणार नाही, उपकार विसरणार नाही. वरील बहुतांशी गाणी दिदींनी त्यांच्या हिंदी चित्रपटातील कारकिर्दीत जेव्हा त्या उच्च पदावर असताना गायली आहे. हिंदी गाण्याचे मानधन हे मराठी गाण्याचे मानधनापेक्षा नक्कीच खुप जास्त असणार. मग आर्थिक व्यवहाराने फायदेमंद नसणारे ही मराठी गाणी दिदींनी का गायली असतील? त्या उच्च श्रेणीच्या गायिके बरोबरच ह्या मातीवर, ह्या मातीतील थोर व्यक्तीवर, हिच्या संस्कृतीवर, मराठी भाषेवर प्रचंड प्रेम, आदर आणि निष्ठा करणाऱ्या तर आहेच पण एक अभिजात कलाकृती करणाऱ्यांची दूरदृष्टी त्यांच्यात आहे. त्यांनी केलेली श्रीनिवास खळे सोबत केलेले "या चिमण्यांनो परत फिरा" (https://youtu.be/0qqy48B8-aIअसो किंवा हृदयनाथांची अनेक भावगीते असो हे त्यांची अभिजात कलाकृती करण्याची आंतरिक इच्छा दाखवते. प्रत्येक गाण्यात स्वतःची signature टाकण्याची तऱ्हा मनाला स्पर्श करणारी आहे.

हिंदी चित्रपटाचा त्यांचा आलेख तर कोणी तोडू शकत नाही. " मेरे वेतन के लोगो" (https://youtu.be/f7G9iQR5uyU) ने किती लोकांच्या डोळ्यातून किती वेळा अश्रु काढले असेल? नौशाद, रोशन, सचीन  देव बर्मन ह्याच्या बरोबर केलेली शास्त्रीय संगीतावरची गाणी जितकी गोड आहे तितकीच सलील चौधरी किंवा शंकर जयकिशन ने केलेल्या पाश्चिमात्य संगीतावर आधारलेल्या fusion तितकेच भारतीय गाणी वाटतात. मदनमोहन ह्यांनी त्यांच्या कडून किती गझल गावुन घेतल्या असतील ते फक्त दिदीच जाणे. राहुल देव बर्मन ह्यांची प्रेम गीते तर मला खूप सुखावणारी आहेत. ‘बेमिसाल’ मधील " री पवन, ढूँढे किसे तेरा मन चलते चलते" (https://youtu.be/Cu2zpXIBWKI) किंवापडोसन’ मधील 'भाई बत्तूर भाई बत्तूर’ (https://youtu.be/iRIXVQrS5s8किंवाघर’ मधील "आजकाल पाव जमीपर नही पडते मेरे" (https://youtu.be/MqCzyGLxQeQ) आणि अशी असंख्य गाणी आपण सर्वांना सुखी करतात.

माझ्या सारख्या मराठी माणसाला त्यांची मराठी आणि हिंदी गाणी ऐकून असा भाव निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण मला खात्री आहे की भारतातील अन्य भाषिकांचा  पण असाच भाव असेल. १९९९ -२००० मध्ये लतादिदींनी दीनानाथ रुग्णालयाच्या मदतीसाठी एक कार्यक्रम पुण्यात केला होता. लग्न झाल्यावर, पुण्यात स्वतःचे घर घेतल्यावर, वर्षाचा आमचा आदित्य असताना खिश्यात किती पैसे असतील? पण मी आदित्यला म्हटले की तुझ्या नातवांना तू  'मी लता दिदींचा Live show बघितला आहे' हे गर्वाने सांगता यावे म्हणून हजाराचे तिकीट काढून हा कार्यक्रम बघायला जाऊ असे सांगत तो कार्यक्रम बघायला गेलो. लतादिदीच्या युगात माझा जन्म झाला हे माझे भाग्यच.


सतीश गुंडावार
28-Sept-19

1 comment:

  1. Great, you are amazing bhau, in writing and in expressing your heart. I feel like, feelings are mine but words are yours..

    ReplyDelete