Friday, 27 December 2019

जयदेव

हिंदी चित्रपटसृष्टीच्या संगीताच्या सुवर्णकाळात वेगवेगळ्या प्रतिभेचे गायक आणि संगीतकार झालेत. प्रत्येकाचे भिन्न स्थान होते आणि ते आपल्या संगीत प्रकाराला प्रामाणिक राहीले. मागच्या ब्लॉग मध्ये सलीलदा बद्दल लिहितांना त्यांच्या fusion आणि पाश्चात्य संगीत शैली बद्दल लिहले. भारतीय श्रोता, प्रेक्षक इतका प्रगल्भ आहे की त्याने हे संगीत पण डोक्यावर घेतले त्याच बरोबर शाश्वत भारतीय संगीतावर प्रेम करणाऱ्या संगीतकारांनाही डोक्यावर घेतले. एकीकडे fusion, पाश्चात्य संगीत आणि दुसरीकडे शुद्ध भारतीय संगीत देणारे संगीतकार असतांना, उपशास्त्रीय, लोकसंगीताचा वापर करणारे संगीतकार पण होते. पण जयदेव एक वेगळेच संगीतकार होते. त्यांनी भारतीय संगीत, उपशास्त्रीय आणि लोकसंगीताचा वापर केलाच पण कमीतकमी वाद्यवृंद वापरून गायकीला जास्त महत्व दिले. पाश्चात्य संगीताचा नगण्यच वापर तसाच पाश्चात्य वाद्यांचा पण नगण्यच वापर केला. जयदेव ह्यांच्या साधारण ४० वर्षांच्या कारकिर्दीत साधारण तितक्याच चित्रपटांना संगीत दिले त्यामुळे खूप लोकप्रिय नसले तरी चोखंदळ श्रोत्यांचे ते नेहमीच आवडते राहीले. त्यांच्या ह्या छोट्या कामाचे योगदान फार मोठे आहे. ते किती महान संगीतकार होते ते त्यांना मिळालेल्या तीन राष्ट्रीय पुरस्कारावरून प्रचिती येते.

जयदेवांनी संगीत प्रवास उस्ताद अली अकबर खान आणि सचिनदेव बर्मन ह्यांच्या बरोबर सुरु केली. त्यांचे ते संगीत संयोजक राहीले. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच ‘हम दोनो’ ह्या चित्रपटाने दमदार सुरुवात केली. ह्या चित्रपटाचे सर्वच गाणी अतिशय श्रवणीय आहेत. ‘हम दोनो’ सोबतच ‘घरोंदा’, ‘गमन’, ‘आलाप’, ‘अनकही’ हे चित्रपट उल्लेखनीय आहेत. त्यांना ‘गमन’, ‘रेश्मा और शेरा’, आणि ‘अनकही’ ह्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. लतादिदीचे ते एक आवडते संगीतकार होते. जयदेवांनी दिदीकडून फार सुंदर गाणी गावुन घेतली. आधी सांगितल्यानुसार गायकीला प्राधान्य दिले असल्याने त्यांच्या गाण्यात लहान prelude आणि interlude दिसतात. वाद्यवृंद लहान असल्याने जयदेवांनी बासरी, सरोद, सतार, संतुर, सारंगी सारख्या मोजक्याच वाद्यांचा वापर केलेला दिसतो. दिदींनी गायलेले 'अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम', https://youtu.be/prJ9NbOycEI  'ये दिल और उनकी निगाहो के साये', 'तू चंदा मैं चांदनी', https://youtu.be/YLTdv2UyFPE आणि 'रात भी है कुछ भिगी भिगी' https://youtu.be/6sDeAi8RYMM  ही गाणी जरुर ऐका. मोहम्मद रफींनी गायलेले 'अभी ना जाओ छोड कर के दिल अभी भरा नही', https://youtu.be/C2Yu5daknUo 'मैं जिंदगीका साथ निभाता चला गया' https://youtu.be/PbTY_m5yZ0w ही उच्च प्रतीची गाणी आहेत. मुकेशचे हे 'जब गम ए इश्क सताता है तो हस लेता हूँ' https://youtu.be/VvZ22P1In4Y दर्दभरे गाणे ऐका आणि थोडा वेळ गुणगुणत रहाल.


जयदेवांनी नवोदित गायकांना नेहमीच संधी दिली. भूपिंदरची बरीच लोकप्रिय गाणी त्यांनीच केली. 'दो दिवाने शहर में', https://youtu.be/tLC8YVxqnVU (रुना लैला सोबत) 'जिंदगी जिंदगी मेरे घर आना', https://youtu.be/KtYND8LoVYo (अनुराधा पौडवाल सोबत) 'एक अकेला इस शहर में' https://youtu.be/EpbjO-Qdfuc ही गाणी आपण ऐकली असेलच. अनुराधा पौडवालचे 'जिंदगी में जब तुम्हारे गम नही थे' https://youtu.be/GicQ-9FICAE हे गाणे. प्रसिद्ध गझल गायिका छाया गांगुलीने कदाचित हिंदी चित्रपटात एकच गाणे गायले असेल ते पण जयदेवांसाठी. 'आपकी याद आती रही रात भर' https://youtu.be/GtCLx-W51xM हे एकच गाणे त्यांना अभिमानास्पद वाटत असेल. ह्या गाण्यात सरोद आणि बासरीचा अप्रतिम वापर आहे. अर्ध्या गाण्यात कोणताच ताल नाही आणि नंतर ताल सुरु होतो असे सुरेल गाणे आहे. सुरेश वाडकरांचे 'सिने में जलन आंखोमें तुफान सा क्यो हें', https://youtu.be/8GFYZ6IgSsk अभिताभ बच्चनने केलेला आलाप हा चित्रपट तसा दुर्दैवी म्हणावा लागेल. ह्या चित्रपटातील सर्वच गाणी सुंदर आहेत पण जास्त लोकप्रिय झाले नाही. बच्चनसाठी जयदेवांनी येसूदास वापरला आहे. 'चांद अकेला जाये सखी री', https://youtu.be/NonCqE3uJEo?t=403 'कोई गाता में सो जाता' https://youtu.be/6Lg1bLwBjLA ही दोन गाणी जरूर ऐका. जर अगोदर ऐकली नसतील तर जरूर आवडेल. रुना लैलाने गायलेले 'तुम्हे हो ना हो ... मुझे प्यार तुमसे नही है' https://youtu.be/AZXSBVWQ8wo पण अप्रतिम आहे. शेवटी पं. भीमसेन जोशींनी ‘अनकही’ मध्ये गायलेले 'ठुमक ठुमक पग कुमद' https://youtu.be/7F2wc15vcD4 हे शास्त्रीय संगीतावर आधारीत भजनाने दोघांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळवुन दिले.

इतका प्रतिभावान संगीतकार असूनही जयदेवांना फारच थोडे चित्रपट मिळाले. जे मिळाले त्यांचे त्यांनी सोने केले. हिंदी चित्रपटसृष्टी सुद्धा अंधश्रद्धेने भरलेली आहे. त्या काळात अशी अंधश्रद्धा होती की जयदेवांनी संगीत दिलेले चित्रपट पडतात. ह्याचे बळी ते ठरले आणि आपण श्रोते त्यांच्या अजून काही कलाकृतींना मुकलो.


सतीश गुंडावार
२-नोव्हे-२०१९
 

No comments:

Post a Comment