Sunday 29 March 2020

गुलाम मोहंमद

हिंदी चित्रपटातील काही संगीतकारांचे जर नाव घेतले नाही तर हिंदी चित्रपट संगीताचा इतिहास पुर्ण होऊ शकत नाही. गुलाम मोहंमद ह्यांचे नाव त्यात नक्की घ्यावे लागेल. चित्रपट सुष्टी कलाकारांचे जितकी चीज करते तितकीच निष्ठुरपणा दाखवते. असेच काहीतरी गुलाम मोहंमद ह्यांचा सोबत झाले. हिंदी चित्रपट संगीतात सर्व प्रकारचे संगीतकार झाले. काहींनी शुद्ध भारतीय शास्त्रीय संगीतावर संगीत दिले तर काहींनी पाश्चात्य संगीताबरोबर प्रयोग पण केलेत. सर्वच प्रयोग उत्तम आहेत. शुद्ध भारतीय संगीतावर संगीत देणारे मोजकेच संगीतकार त्यात गुलाम मोहंमद ह्याचे नाव सन्मानाने घ्यावे लागेल. त्यांनी पाश्चात्य वाद्य वापरली पण ती भारतीय संगीतात अशी मिसळली आहे की कळत नाही.
राजस्थानी लोकसंगीत, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्याचे विद्वान. स्वतः उच्च दर्जाचे तबला, पखवाज, ढोलक वादक आणि नृत्यात पारंगत असे सुंदर मिश्रण गुलाम मोहंमद ह्यांच्यात होते. मुंबई मायानगरी जिथे लोकं आपले नशीब आजमावायला येतात तसे हे पण १९२४ मध्ये आले. पण संघर्ष कठीण होता. पण नियती हिऱ्याची किती दिवस परीक्षा घेणार? सुगीचे दिवस उशीरा ( वर्षांनी) का होईना पण आले. सुरुवातीचे दिवस तबला वादक म्हणून काम केले. त्यात नौशाद ह्यांच्याशी मैत्री झाली. खरे तर गुलाम मोहंमद नौशाद पेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे. पण जेव्हा नौशादांचे चांगले दिवस आलेत त्यांनी आपल्या मित्राला सहाय्यक म्हणुन ठेवले. गुलाम मोहंमद हे नौशाद आणि अनिल बिस्वास ह्याचे सहाय्यक म्हणून १२ वर्षे काम केले. ह्या सर्वांच्या संगीतावर एकमेकाचा प्रभाव दिसतो. गुलाम मोहंमद ह्यांनी ढोलक, चिमटा, डफ, मटका आणि खंजिरी हे वाद्य पहिल्यांदा चित्रपट संगीतात आणले.
पुढे गुलाम मोहंमद ह्यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून काम Tiger Queen (१९४७) पासून सुरु केले. पण १९५२ पासून त्यांच्या कामाची लोक दखल घेऊ लागले. राज कपूर, नर्गीस ह्यांचा अंबर ह्या चित्रपटात उल्लेखनीय संगीत दिले. लैला मजनू (१९५३) मधील तलत मेहमूद ह्यांचे 'चल दिया कारवा, लूट गये हम यहा तुम कहा' आणि लता दीदी सोबतचे 'आसमां वाले तेरी दुनिया से दिल घबराया' गाणे सुंदर आहेत. इथून गुलाम मोहंमद ह्यांचे नाव व्हायला सुरुवात झाली. त्याच वर्षी आलेल्या दिल नादान ह्या चित्रपटात तलत मेहमूद ह्यांनी 'जिंदगी देने वाले सुन, तेरी दुनियासे दिल भर गया' हे अविस्मरणीय गाणे दिले. १९५४ साली आलेल्या मिर्झा गालिब ह्या चित्रपटाने गझल गायकीला एक वेगळेच स्थान चित्रपटात दिले. तलत मेहमूद आणि सुरैय्या ह्यांनी अप्रतिम गझल ह्या चित्रपट गायल्या आहेत. 'दिल नादान तुझे हुआ क्या है', 'इश्क मुझको नही वहशत ही सही' जरूर ऐका. शमा ह्या चित्रपटातीलसुरैय्या ह्यांनी गायलेले 'धडकते दिल की तमन्ना हो मेरा प्यार हो तुम' अप्रतिम आहे. शम्मी कपूर ह्यांच्या पहिल्या (कदाचित?) चित्रपटात एक गाणे शमशाद बेगम आणि रफींनी गायले आहे. ते गाणे हिंदी चित्रपटातील कदाचित पहिले rap song असेल 'ला दे मोहे बालमा आसमानी चुडीया'. मधल्या काळात त्यांनी बऱ्याच चित्रपटांना संगीत दिले, चांगले पण दिले. पण हिंदी चित्रपट सृष्टीचा निष्ठुरपणा त्यांना भोवला. ह्या गुणी संगीतकाराने केलेल्या कामाचे व्हावे तेवढे कौतुक झाले नाही.
त्यांच्या कारकिर्दीचा उच्चबिंदु म्हणजे पाकीजा. कमाल अमरोही ह्यांनी ह्या हिऱ्याची कदर केली आणि हा चित्रपट त्यांना दिला. गुलाम मोहंमद ह्यांच्या संगीताने हा चित्रपट हिंदी चित्रपटातील संगीतासाठी एक मानबिंदु झाला. ह्या चित्रपटात गुलाम मोहंमद ह्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि त्यांच्या नृत्य कलेचे संपूर्ण ज्ञान वापरून संगीत दिले. त्यांचा छोटा भाऊ अब्दुल करीम हा ताकदवर तब्बलजीने आणि स्वतः गुलाम मोहंमद ह्यांनी अजरामर ठेका ह्या चित्रपटातील गाण्यात वापरला आहे. लता दीदींनी एकावर एक अशी सुंदर गाणी ह्या चित्रपटात गायली आहेत. 'आज हम अपनी दुवाओ असर देखेंगे, तीर नजर देखेंगे'. ह्यातील मुजरा 'थारे रहियो बांके यार' मधील तबल्याचा ठेका ऐका. 'मोसम हे आशिकाना' हे पण सुंदर आहे. लता दिदी आणि रफ़ी ह्यांचे 'चलो दिलदार चलो चांद के पार चलो' आणि कळस म्हणजे 'चलते चलते युही कोई मिल गया था' आणि 'इन्हीं लोगों ने ले लीना दुपट्टा मेरा'  ह्यातला तबला एक मानबिंदु आहे. मी एक कानसेन आहे. जे मला आनंद देतात त्या बद्दल लिहतो पण संगीताची सखोल चिकित्सा माझे काम नव्हे. संगीततज्ञानी ह्या चित्रपटाच्या संगीताचे विस्तृत चिकित्सा केली असेलच. ते हा चित्रपट पूर्ण करू शकले नाही. पुढे त्यांच्या मित्राने म्हणजे नौशाद ह्यांनी पूर्ण केला. हा चित्रपट १९७२ साली प्रकाशित झाला तेव्हा गुलाम मोहंमद ह्या जगात नव्हते. ह्या गुणी कलाकाराचे सारे कौतुक त्यांच्या गेल्यानंतर झाले. गुलाम मोहंमद ह्यांच्या उल्लेखाशिवाय हिंदी चित्रपट संगीताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.
ही सर्व गाणी जरूर ऐका तुम्हाला अभिजात संगीत ऐकण्याचा आनंद जरूर मिळेल.

सतीश गुंडावार
२९-मार्च-२०२०

4 comments:

  1. तुमच्या या पैलूचा आजच परिचय झाला.
    छान वाटले.

    ReplyDelete
  2. Excellent and detailed compilation.
    Good reading.

    ReplyDelete
  3. गुलाम मुहम्मद ह्यांचा परिचय आम्हाला झाला, केवळ तुमच्यामुळे.धन्यवाद!

    ReplyDelete