Saturday 11 April 2020

कळस दिसू लागले

मागच्या आठवड्यात ब्राझीलचे पंतप्रधान श्री जैर बालसोनारो ह्यांनी जसे रामायणात हनुमान हिमालयातून संजीवनी बुटी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवतो त्याची आठवण करत भारताला Hydroxychloroquine साठी लागणारा कच्चा माल पुरवण्याची मदत करा अशी विनंती केली. त्याच दरम्यान अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष श्री डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी हेच औषध लवकर पुरवा अशी विनंती केली. देशाचे हीत बघत भारत सरकारने ह्या औषधीच्या निर्यातीवर निर्बंध घातले होते. ह्या पार्श्वभूमीवर ह्या दोन राष्ट्राध्यक्षांनी ही विनंती केली होती. भारत सरकारने जगाची कोरोना व्हायरस मुळे एकंदरीत स्थिती बघत भारताच्या शेजारी देशांना आणि ज्या देशांना ह्या औषधींची अत्यंत गरज आहे त्यांना ही औषधी पुरवण्याचे मान्य केले. सुरुवातीला श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष ह्यांनी भारताचे आभार मानले. दोन दिवसांपूर्वी ब्राझीलचे पंतप्रधान ह्यांनी त्यांच्या देशाला संबोधतांना श्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेचे आभार मानले. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष श्री डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी पण श्री नरेंद्र मोदी आणि भारताचे आभार मानले आणि म्हणाले की ह्या मदतीची आम्ही आठवण ठेवू. भारताने ब्राझील आणि अमेरिकेला हे औषध मोफत दिली नाहीत तरी ह्या देशाने भारताचे आभार का मानावे?

मागच्या आठवड्यात अशीच एक बातमी आली होती. फ्रान्सने चीनला मास्क पुरवण्याची विनंती केली तर चीनने आधी आमची 5G चे तंत्रज्ञान घ्या अशी अट टाकली होती. अश्या काही अटी भारताला पण ब्राझील आणि अमेरिकेला टाकता आल्या असत्या. पण भारताने तसे काही केले नाही. मित्रत्वाचे नाते मनात ठेवत, दातृत्वाचा भाव जोपासत, "मा फलेषु कदाचन" कृतीत आणून ही मदत केली. व्हाइट हाऊसच्या Twitter Handle ने श्री नरेन्द्र मोदी आणि PMO ला follow करायला सुरुवात केली. ह्या सर्व घटना असाधारण आहेत आणि भविष्य काळाच्या नांदी आहेत.
ह्या कोरोना व्हायरसने जगातील तंत्रज्ञानातील प्रगती, वैद्यकीय सेवेतील विषमता, आर्थिक दरी, सामाजिक दरी, धर्मातील भेद, नास्तिक आस्तिक द्वेष हे सर्व पुसून टाकले आहे. एखादा देश आर्थिक, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने जर प्रगत आहे म्हणजे तो देश ह्या महामारीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवू शकेल ह्या विश्वासाला ह्या संकटाने छेद दिला आहे. लष्करी शक्ती तर ह्यात कुठे बसतच नाही. आज अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी सारखे प्रगत आणि श्रीमंत देश ह्या महामारीवर नियंत्रण आणण्यात असमर्थ झाले आहेत. पण ज्या देशाने त्यांचे राष्ट्रीय आणि सामाजिक चारित्र्य दाखवले त्या देशांना ह्या महामारीवर काही प्रमाणात यश मिळत आहे असे दिसते. जपान, कोरिया आणि भारत असे काही देश विजयाच्या मार्गावर आहेत.

कोरोना संकट असे रूप घेईल ह्याची जगाने कधी कल्पना पण केली नव्हती. सारा देश ३ आठवडे बंद करावा लागेल असे भाकीत मोठमोठ्या विद्वानांना पण करता आले नाही. मोदींनी देशाला २२ मार्चला जनता कर्फ्यु पाळण्यास विनंती केली असो किंवा एप्रिलला रात्री वाजता मिनिटे घरची दिवे घालवून पणत्या लावण्याची विनंती केली असो त्याला जो प्रतिसाद कुटुंब, समाज, एक गाव, एक राज्य आणि सबंध देश देत आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे. गेल्या काही दिवसातील एकूणच देशबांधवांचे आचरण बघता आणि रा. स्व. संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सेवा भारती, विश्व हिंदू परिषद आणि असंख्य समाजसेवी संघटना गरजूंना राशन पुरवठा, अन्नपूर्णा योजना, पोलीसांना मदत, वैद्यकीय सेवेत मदत हे बघता ह्यात देशबांधवानी त्यांचे राष्ट्रीय आणि सामाजिक चारित्र्य नक्कीच दाखवले आहे. त्यात काही परीट असतील पण देशाच्या अग्निपरीक्षेला हे परीट आवश्यक आहेत ना. हे सर्व बघतांना एक संघाचे गीत आठवले. त्यात एक ओळ आहे ‘अगणित भगीरथांचे यास्तव अविरत व्रत चालले’ ह्या गीतात पुढे एक कडवे आहे ते ह्या सर्व वातावरणाचे समर्पक चित्र डोळ्यासमोर आणते.
||आव्हानाच्या पाषाणावर खोदू शिल्पे नवी
मरुभूमी वरीही ऐसे झिरपू फुटेल नवी पालवी
सद्भावाचे मांगल्याचे शिंग आम्ही फुंकले||
गेल्या काही महिन्यात काही जागतिक संघटनेचे वर्तन तसे काही समाधानकारक नाही राहिले. जेव्हा इटलीने युरोपियन युनियनला मदत मागितली तर ती दिली गेली नाही. इटली मध्ये सध्या युरोपियन युनियनच्या विरुद्ध जनमत तयार होत आहे. जनता युरोपियन युनियनच्या बाहेर पडा अशी मागणी करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ज्या प्रमाणे चीनची पाठराखण करत सर्व जगाला धोक्यात टाकले त्यामुळे बरेच देश नाराज आहेत. डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी उघडपणे WHO ला ह्या पुढे मदत मिळणार नाही हे घोषित केले. जपानने चीन मधून जपानी कंपन्या बाहेर पडतील अशी योजना बनवली आहे. UN किंवा WTO ह्या संघटनांचे ह्या संकट काळात जगाला हवे तसे मार्गदर्शन झाले नाही ही खंत बऱ्याच देशाने केली आहे. जागतिक समीकरणे ह्या महामारीमुळे बदलतील असे चित्र उभे राहात आहे. एकंदर भारताचे SAARC, G20 समुहात ज्या प्रकारचे वर्तन राहिले त्याची जगाने नोंद घेतली आहे, कित्येक देशाने भारताचे कौतुक केले आहे. हे बघता भारत अजून एकदा जगतगुरु होण्याच्या मार्गावर जात आहे असे आश्वासक चित्र दिसत आहे. हे बघत असतांना त्याच गीतातील अजून एक ओळ आठवते

||लक्ष पावलां सवे चालती लक्ष नवी पावले
दूर जरी ध्येयाचे मंदिर, कळस दिसू लागले।।

सतीश गुंडावार
११-एप्रिल-२०२०

4 comments:

  1. Well said dear,keep writing....

    ReplyDelete
  2. नोस्त्रादेमसचे म्हणणे खरे होईल असे वाटते...अर्थात ते त्याने लिहिले म्हणून नाही तर आपल्या कर्तृत्वाने..

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिले आहे, सतीश

    ReplyDelete
  4. सर्वांचे मनापासून आभार

    ReplyDelete