Sunday 29 March 2020

रा. स्व. संघाचे विज्ञान


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत नुकत्याच एका भाषणात म्हणाले की, एक स्वयंसेवक संघाची पुनर्निर्मिती करू शकतो.” त्यांच्या ह्या वक्तव्यात संघाचे संस्थापक, आद्यसरसंघचालक परमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार ह्यांच्या संघाच्या निर्मिती मागील चिंतनाचे संपूर्ण सार आहे. ना. . पालकर ह्यांनी लिहिलेल्या डॉ. हेडगेवार यांच्या चरित्रात, त्यांच्या राजकीय आणि क्रांतिकारक जीवनातील अनुभवांवरून, हिंदू धर्माच्या आणि त्यातून भारताच्या समस्या व प्रश्न हे फक्त प्रशिक्षित आणि संघटित हिंदूच दूर करू शकतो हा निष्कर्ष दिसतो. संघाचा स्वयंसेवक एक तास शाखेत जातो आणि उरलेले २३ तास संघाचे संस्कार आपल्या व्यक्तिगत जीवनात वापरत असतो. इतकी वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असताना मला संघाच्या कामाची पद्धत आणि आधुनिक व्यवस्थापन शास्त्र आणि विज्ञान ह्याचा सुंदर मेळ दिसतो.
राष्ट्राच्या आणि धर्माच्या उभारणीसाठी अनेकांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. पण त्या कामाचा आधारस्तंभ असलेल्या व्यक्तीच्या पश्चात तिने चालू केलेले काम बिकट परिस्थितीत जाऊन नष्ट होते. इंजिनीरिंगमध्ये पर्पेच्युअल मशिन अशी संकल्पना आहे म्हणजे, ते यंत्र कायम सुरु असेल बंद पडत नाही. त्याप्रमाणे अपेक्षित प्रशिक्षण घेवून संघटित झालेला हिंदू समाज आपल्या हिंदू धर्माचे उत्थान करायला किती वर्षे लागतील ह्याचा निश्चित अंदाज डॉ. हेडगेवार यांच्या चिंतनात असेल. त्यांनी संघटनाचा असा काही मंत्र दिला की, संघटन आपल्या पश्चात निरंतन सुरु राहील. आजपर्यंत संघावर अनेक संकटे आली; गांधीजींच्या हत्येनंतरची बंदी, इ.स. १९७५ मध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी, पण संघाचे काम सुरु राहिले आणि वाढतच गेले. डॉ. हेडगेवार यांनी त्यांच्यासारखे काम करणारे, विचार करणारे, आचार करणारे असंख्य स्वयंसेवक घडवले. ही प्रक्रिया पर्पेच्युअल आहे, आजही सुरु आहे आणि भविष्यात सुरु राहील. डॉ. हेडगेवार यांना प्रत्यक्ष बघितलेल्या स्वयंसेवकांची संख्या आता फारशी नाही. पण त्यांचे प्रतिबिंब प्रत्येक स्वयंसेवकात कमी जास्त प्रमाणात दिसते हेच डॉ. हेडगेवार यांच्या चिंतनाचे यश आहे.
न्यूक्लियर फिजिक्समध्ये चेन रिअॅक्शन अशी एक संकल्पना आहे. संघाच्या स्वयंसेवकाने स्वयंसेवक घडवण्याची चेन रिअॅक्शन निर्माण केली आहे, जी १९२५ साली सुरु झाली ती अजूनही सुरु आहे. ही चेन रिअॅक्शन थांबवणे आता अशक्य आहे. अश्या पर्पेच्युअल चेन रिअॅक्शनमधून काय निर्माण झाले तर त्याला संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक श्री. माणिकराव पाटील, परीस म्हणतात आणि हे परीस असे आहेत की, ह्याच्या स्पर्शाने सोने होता अजून परीस तयार होते. संघाच्या ९५ वर्षाच्या वाटचालीत संघाचे अस्तित्व संपवण्याचा खूप प्रयत्न झाला. बाहेरून संघ संपवण्याचे प्रयत्न सर्वांना माहीत आहेत. मी बऱ्याच वरिष्ठ स्वयंसेवकांना विचारले की, कधी संघ आतून पोखरून नष्ट करण्याचा प्रयत्न झाला काय? कोणालाही असा प्रयत्न माहीत नाही किंवा ऐकलेले नाही. पण समजा असे प्रयत्न झाले असतील तर ह्याच परीसाचा प्रभाव असेल की असे सर्व प्रयत्न विफल झाले असतील.
कोणत्याही उत्तम आणि प्रगतीशील कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे सतत नावीन्यपूर्ण (इनोव्हेशन) वाटचाल, सतत ट्रान्झिशन प्लॅनिंग, मेंटॉरशीप, चेंज मॅनेजमेंट आणि ट्रेनिंग, रिस्किलींग, मल्टिस्किलींग त्यानंतर डाव्हर्सिफिकेशन. संघाच्या कार्यपद्धतीमध्ये हे सातत्याने बघायला मिळते. संघाच्या कार्यविभागाचे प्रशिक्षण वर्ग, मासिक बौद्धिक वर्ग, संघाची हिवाळी शिबिरे, संघ शिक्षा वर्ग, संघाच्या दरवर्षी होणाऱ्या नियुक्त्या आणि त्यात सहजपणे होणारे जबाबदाऱ्यांमधील बदल हे तर मला कॉर्पोरेट क्षेत्रात अपवादानेच बघायला मिळतात. संघाने नुकताच आपल्या गणवेषात बदल केला, त्याची चेंज मॅनेजमेंट, ही एक कॉर्पोरेट केस स्टडी होऊ शकते.
एक यशस्वी कंपनी आपल्या प्रगतीसाठी डायव्हर्सिफिकेशन करते. डॉ. हेडगेवार यांच्या काळात राष्ट्र सेविका समितीच्या रूपाने पहिले डायव्हर्सिफिकेशन झाले होते. नंतर गांधीजींच्या हत्येनंतरच्या बंदीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सुरुवात झाली होती. त्यानंतर जनसंघाची (राजकीय पक्ष) स्थापना झाली. डॉ. हेडगेवार यांनी सांगितलेल्या, 'संघ काही करणार नाही, संघाचे स्वयंसेवक करतील', ह्या तत्वानुसार संघाचे पुढील काळातील डायव्हर्सिफिकेशन झाले. आज ३५ अन्य मुख्य संघटना आहेत आणि असंख्य सेवा उपक्रम जगभर आहेत. ते ज्या क्षेत्रात काम करतात त्यात सर्वोच्च स्थानावर आहेत. ह्या सर्व डायव्हर्सिफाईड कामांच्या कार्याची पद्धत संघाच्या शाखेसारखी किंवा संघासारखी असू शकत नाहीत. ह्या सर्व संघटनांची स्वतंत्र कार्य पद्धती आहे. तशी स्वतंत्र कार्य पद्धती निर्माण करण्याचे मूलभूत चिंतन संघाच्या वरिष्ठ स्वयंसेवकांमध्ये होते आणि आहे. मूलभूत विचार करण्याची शिकवण संघाने स्वयंसेवकांना दिली आहे. अशी मूलभूत विचार करणाऱ्यांची जी साखळी १९२५ साली सुरु झाली ती आज देखील दिसते. प्रसार माध्यमांमध्ये संघाकडे विचारवंत नाही अशी आवई उठवली जाते पण संघाचे विचारवंत प्रसिद्धीच्या मागे पळत नाही हे त्यांना माहीत नसते.
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा विशाल वृक्ष आणि त्याच्या सोबत असणाऱ्या विविध संघटना यांचे मिळून एक सुंदर उपवन भारतात निर्माण झाले आहे. पण ह्याचे बीज जेव्हा डॉ. हेडगेवार यांनी १९२५ साली लावले, त्या बीजात ह्याचे सर्व डीएनए होते. ह्या डीएनए चे एक सोपे स्वरूप सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केलेल्या वक्तव्यात आहे.
आपल्या पश्चात आपल्यासारखा विचार करणारी, समर्पण करणारी, त्याग करणारी असंख्य स्वयंसेवकांची साखळी तयार झालेली असेल, ज्यात आपलेच प्रतिबिंब असेल असे संघटन उभे करणारे आधुनिक काळातील एकमेव द्रष्टा महात्मा म्हणजे पूरमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार!
पू. डॉक्टरांचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडवा, शके १८११ म्हणजेच १ एप्रिल१८८९ रोजी नागपूरला झाला. गुढीपाडव्याच्या ह्या पवित्र पर्वानिमित्त त्यांना माझी ही छोटी आदरांजली!!

-    सतीश माधवराव गुंडावार
२४-मार्च-२०२०

No comments:

Post a Comment