Wednesday 11 March 2020

कवी प्रदीप

'ए मेरे वतन के लोगो' हे गाणे न ऐकलेला एकही भारतीय नसेल. हे गाणे कवी प्रदीप ह्यांचे आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या गांधी जयंतीला जी देशभक्ती गीते आपण ऐकतो त्यातली बरीच गाणी ही कवी प्रदीपने लिहिली असतात. हिंदी चित्रपट सृष्टीच्या मायानगरीत आपले सत्व, तत्व आणि साधेपणा टिकवणारे तसे फारच कमी. कवी प्रदीप त्यापैकीच एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आणि गांधीवादी विचाराचे. रामचंद्र नारायण द्विवेदी म्हणजेच कवी प्रदीप. १९३९ साली कवी संमेलनासाठी मुंबईला आले आणि तिथेच हिंदी चित्रपटासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचाच व्यक्तिमत्वासारखे त्यांची गाणी सोपी आणि सरळ भाषेत जी सामान्य माणसाला लगेच कळेल अशी आहेत. हिमांशू रॉय ह्या महान चित्रपट निर्मात्याने ह्या हिऱ्याला शोधून काढले. १९३९ साली कंगन ह्या चित्रपट पासून सुरुवात झाली आणि ती वाढतच गेली.

कवी प्रदीपांनी सगळ्या प्रकारची चित्रपट गीते लिहिली पण त्यांच्या देशभक्ती, सामाजिक आणि धार्मिक गीतांनी हिंदी चित्रपटसृष्टी समृध्द केली. त्यांच्या पहिल्या देशभक्ती गीताने तर खूप खळबळ माजवली. १९४३ साली आलेल्या किस्मत चित्रपटातील 'दूर हटो ए दुनियावालो ये हिंदुस्थान हमारा है' हे गाणे साऱ्या देशाने डोक्यावर घेतले. चित्रपट गृहात once more वर once more व्हायचे. चित्रपटगृह चालकाला चित्रपट थांबवून रीळ परत गुंडाळून अजून हे गाणे लावावे लागे. १९४२ च्या चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर हे गाणे ऐका. ब्रिटिश सरकारने चित्रपटाला परवानगी तर दिली पण हे गाणे सत्याग्रहाचे प्रतीक बनेल हे त्यांना लक्षात आले नाही. ब्रिटिशांनी नंतर ह्या गाण्यावर बंदी घातली आणि कवी प्रदीप ह्यांच्या अटकेचा आदेश काढला.

त्यानंतर महत्वाचा पडाव म्हणजे १९५४ साली आलेला जागृती हा चित्रपट. चित्रपट तसा साधा आणि शाळेवर आधारित कथा पण कवी प्रदीपांनी आपल्या गीतांनी त्या चित्रपटाचे सोने केले. 'आवो बच्चो तुम्हे दिखाये झाकी हिंदुस्तानकी', 'हम लाये हे तुफानसे किश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चो संभाल के, ' दे दी हमे आझादी बीना खडग बीना ढाल, साबरमतीके संत तुने कर दिया कमाल'. ही गाणी इतकी गाजली की पाकिस्तान मध्ये त्याच काळात बेदारी नावाचा चित्रपट आला. त्या चित्रपटात ही गाणी थोडे शब्द बदलून चाली सकट वापरली आहेत.

देशभक्ती गीताचा कळस म्हणजे ''ए मेरे वतन के लोगो' हे गीत. १९६२ च्या चीनच्या युद्धात पराभवानंतर देशबांधवांचे मनोबल उंचावण्यासाठी हे गीत लिहले. १९६३ च्या प्रजासत्ताक दिना निमित्य हिंदी चित्रपट सुष्टीतील महान कलाकारांनी एक कार्यक्रम ठरवला होता. त्या कार्यक्रमात आधीच प्रदर्शित झालेली गाणी होती. हे असे एकच गाणे होते की ते पहिल्यांदा गायले गेले होते. आपण सर्वांना माहीत आहे की हे गाणे ऐकून पं. नेहरूंच्या डोळ्यात पाणी आले. लतादिदी म्हणतात की त्यानंतर जेवढे stage shows त्यांनी केलेत त्यात हे गाणे त्यांना गायलाच लागायचे. असा प्रभाव सामान्य जनमाणसावर ह्या गाण्याने केला. कवी प्रदीप ह्यांनी हे गाणे कोणत्याही चित्रपटात वापरू दिले नाही आणि आणि ह्या गाण्याचे संपुर्ण मानधन सैनिकांच्या विधवांच्या संस्थेला दिले.

समाजाचे मनोबल उंचावे, तरुणांना प्रेरणा मिळावे म्हणून कवी प्रदीपनी खूप गाणी लिहिलीत. 'चल चल रे नौजवान', 'इन्साफ कि डगर पे’, 'चल अकेला चल अकेला, तेरा मेला छुटा.. ', 'उपर गगन विशाल' ही गाणी आपण ऐकली आहेत. कवी प्रदिपांनी समाजाला आरसा दाखवायला वडीलकीच्या नात्याने बरीच गाणी लिहली. 'देख तेरे संसार कि हालत क्या हो गयी भगवान कितना बदल गया इंसान', 'इन्सान का इन्सान से हो भाईचारा', ‘कभी धूप कभी छाव', 'अंधेरे मे जो बैठे है, नजर उन पर भी कुछ डालो' आणि बरीच अशी गाणी.

देशभक्ती आणि समाज प्रबोधनाच्या गाण्या सोबत कवी प्रदीप ह्यांनी बरीच धार्मिक गाणी लिहिली. १९७५ साली 'जय संतोषी माँ' हा चित्रपट 'शोले' च्या सोबत प्रदर्शित झाला होता. ह्या चित्रपटाने शोले इतकाच व्यवसाय केला. ह्यातील गाणी खूप प्रसिद्ध झालीत. 'मै तो आरती उतारू रे संतोषी माता की', 'करती हूं तुम्हारा व्रत मै' ही गाणी गावोगावी वाजलीत. अशी जादू कवी प्रदीप ह्यांच्या गाण्याची होती. बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो की कवी प्रदीप ह्यांनी फक्त देशभक्ती आणि धार्मिक गाणी लिहिली. त्यांनी बरीच प्रेम गीते आणि चित्रपटाला लागणारी इतर गाणी पण लिहिलीत. 'ना जाने कहा तुम थे' हे सुंदर गाणे कवी प्रदीप ह्यांचेच.

कवी प्रदीप हे सुरेख गायक पण होते. 'देख तेरे संसार कि हालत क्या हो गयी भगवान', 'कभी धूप कभी छाव', आणि बरीच गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांची एक ख्याती होती. गाणे लिहून आणले की त्याची चाल पण सांगायचे. कित्येक संगीतकार त्यांना चाल विचारायचे आणि त्याच चालीवर संगीत द्यायचे.

देशभर शाहीनबाग सारखे आंदोलन बघितले की १९५८ मध्ये प्रदर्शित झालेल्या तलाक चित्रपटात त्यांनी लिहिलेले 'कहनी है एक बात हमे इस देश के पहरेदारोसे, संभल के रहना अपने घर में छिपे हुए गद्दारों से' हे गाणे आठवते. देशार्गंत शत्रू देश तोडायचे कसे काम करत आहे ते त्यांनी १९५८ सालीच लिहून ठेवले आहे. शाहीनबाग, anti CAA प्रदर्शन आणि त्या नंतर जागोजागी होणाऱ्या हिंसाचाराचे समर्पक प्रतिबिंब ह्या गाण्यात आहे. आवर्जुन हे गाणे संपूर्ण ऐका.

लोक त्यांना महाकवी, बापू, पंडितजी ह्या नावाने बोलावयाचे. त्यांचे अजून एक टोपणनाव होते जे माझे पण आहे. त्याचा मला आनंद आहे. त्यांनी काही गाणी Miss कमल B.A. ह्या नावाने लिहिलीत. भारत सरकारने त्यांना १९९७ साली दादा साहेब फाळके पुरस्काराने त्यांच्या कामाचा योग्य गौरव केला. हा blog लिहताना ही सर्व गाणी अजून ऐकली. प्रत्येक गाण्याने डोळे ओलावले. माझी खात्री आहे तुम्ही पण तसाच अनुभव घ्याल.

 

सतीश गुंडावार

१० मार्च २०२०

1 comment: