Friday 27 December 2019

Saxophone अर्थात नागांग


मला भारतीय असण्याचा अभिमान असण्याचे एक कारण आहे की आपण कोणत्याही गोष्टीचे लगेच भारतीयकरण करतो. संगीत, कला, संस्कृती, खानपान किंवा पेहराव ह्यांचे भारतीयकरण झालेले आपण नेहमी बघतो. हे कदाचित आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट असेल. अश्याच एका भारतीयकरणाची एक गोष्ट आज सांगतो. अगदी लहानपनापासून मला एका वाद्यांचे आकर्षण राहिले ते म्हणजे Saxophone  अर्थात नागांग. त्याचा विशिष्ट आकार आणि त्यावरील आकर्षक बटना मुळे हे वाद्य आकर्षित करतेच पण त्याचा आवाज पण फार मोहक आहे.

हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळात असा संगीतकार सापडणे कठीण की ज्यांनी हे वाद्य वापरले नसेलपाश्चात्य देशात Rock आणि Jazz मध्ये मुख्यत्त्वे वापरले जाणारे हे वाद्य भारतीय संगीतकारांनी आणि वादकांनी सर्व प्रकारच्या रसात ह्या वाद्याचा वापर सर्जनशीलतापुर्वक केला. गाण्याचा रस कोणताही असो romantic, sad, club songs, किंवा rock and roll ह्या सर्व गाण्याचा mood ह्या वाद्याने रंगवला. ते मिनिटांच्या गाण्यात १० ते २० सेकंद वेळ ह्या वादकांना मिळाला असेल पण त्या वेळात पण ह्या कलाकारांनी त्यांची सर्जनशीलता दाखवली आहे. Saxophone चा वापर केलेल्या गाण्याची संख्या एवढी आहे की त्यातुन काही गाणे सांगणे म्हणजे समुद्रात मोती शोधण्यासारखे आहे.

Club मधील गाण्यात हे वाद्य पडद्यावर पण आले. LP चे 'मैं आया हुं लेके साज(https://youtu.be/RRzITO8hsw8). हिरोच्या हातातले वाद्य म्हणून Saxophone ने लवकरच नाव केले. ह्या गाण्यात prelude आणि interlude खूप Saxophone वापरले आहे. Saxophone आणि trumpet ची चांगली जुगलबंदी ह्या गाण्यात आहे. Muted trumpet चा अप्रतिम उपयोग ह्या गाण्यात ऐकायला मिळतो. पी नय्यर चे “हुजुरेवाला जो हो इजाजत” (https://youtu.be/-6ym4uOOtEo) हे गाणे तसे भारतीय थाटाचे पण Saxophone चा वापर prelude मध्ये अप्रतिम आहे. भारतीय थाटाचे गाणे club मध्ये असा विचार फक्त पी नय्यरच करू शकतात.  RD ने तर हे वाद्य फार वापरले आहे. 'तिसरी मंझिल' सर्वांनीच बघितला आहे. त्यातील ' हसिना झुल्फोवाली'  (https://youtu.be/uaTyirMKOBw ) मध्ये Saxophone ऐकण्यासारखा आहे. ह्या गाण्यात शम्मीकपूरच्या हातात Saxophone, Trumpet आणि Trombone हे तीनही brass वाद्य आहेत.  तसेच कारवा मधील 'पिया तू अब तो आजा' (https://youtu.be/dX-gSSLmxUU) मध्ये trumpet सोबत Saxophone आहे.

दर्दभरे गाण्यात किंवा विरह गाण्यात सुद्धा ह्या वाद्याने तो भाव जागृत करण्यात मदत केली. ही कमाल कदाचित भारतीय संगीतकारांचीच. सलिलदांचे 'जा रे उड जा पंछी' (https://youtu.be/YTMxRVtgLy4) , पी नय्यर चे 'हैं दुनिया उसीकी जमाना उसीका' (https://youtu.be/i85EpitOIkM). प्रत्येक interlude मध्ये Saxophone चा अप्रतिम वापर आहे. कल्याणजी आनंदजी चे 'तुम्हे याद होगा' (https://youtu.be/fvEIULDxSgI). हे गाणे तर Milestone गाणे आहे. ते पुढे सांगेन. शंकर जयकिशनचे 'बेदर्दी बालमा तुझको मेरा मन' (https://youtu.be/qixsOfJccUo) ह्या सर्व गाण्यांची उंची ह्या वाद्याने वाढवली.

Romantic गाण्यात तर हे वाद्य मुक्तपणे वापरले आहे. 'रुप तेरा मस्ताना' (आराधना) (https://youtu.be/HenA-OUyo0s), 'गाता रहे मेरा दिल' (गाईड) (https://youtu.be/7J1nr0-2O60), 'जा ने दो ना' (सागर) (https://youtu.be/6AWm00bSHiM), 'माना हो तुम बेहद हसीन' (https://youtu.be/Pu3c5WntSgo), 'मेरा प्यार भी तू हें’ (साथी) (https://youtu.be/iXprkd-pA_M),  ' ओ हंसिनी कहाँ उड़ चली' (https://youtu.be/R4Vj_XsfHTM). ह्या सर्व गाण्याच्या Romantic mood ला ह्या वाद्याची झालर आहे. तुम्हाला ह्या व्यतिरिक्त काही गाणी आठवत असेल तर मला जरूर सांगा.

हिंदी गाण्यात Saxophone ऐकले की आठवण येते ती मनोहरी सिंग ह्यांची. सचिनदेव बर्मन, सलिलदा आणि राहुलदेव बर्मन ह्यांच्या गाण्यात Saxophone ऐकले की समजायचे की ते मनोहरी सिंग ह्यांनी वाजविले असणार. मनोहरी सिंग हे नेपाळी वंशाचे वादक कलकत्ता मध्ये प्रसिद्ध होते. ते पुढे १९५८ मध्ये मुंबईला आले आणि हिंदी चित्रपट संगीतात हे प्रमुख वाद्य झालेमनोहरी सिंग ह्यांना हिंदी चित्रपट सृष्टीतील Saxophone चे एक अनभिन्य सम्राट म्हणायला पाहिजे. 'तुम्हे याद होगा' ह्या गाण्यात १९५९ मध्ये solo saxophone त्यांनी वाजवला आणि ह्या वाद्याचा हिंदी गाण्यातला काळ सुरु झाला. स्वातंत्र्यापूर्वी अनिल बिस्वास ह्यांच्या वाद्यवृंदात रामसिंग म्हणून एक उत्कृष्ट Saxophone वादक होते. पण मधे मोठा काळ हे वाद्य मागे पडले ते मनोहरी सिंगनी अजुन पुढे आणले. त्यांना समकालीन राज सोढा, श्याम राज, आणि आपला मराठमोळा सुरेश यादव ह्या वादकांनी Saxophone अप्रतिम वापर हिंदी चित्रपटाच्या गाण्यात केला. अगदी आपल्या मराठी गाण्यात पण Saxophone खूप वापरला आहे. पं. हृदयनाथांनी संपेल ना कधी ही, हा खेळ सावल्यांचा’ (https://youtu.be/hQDPV8bVv9c) आणि श्रीनिवास खळेंनी ‘सावलीस का कळे’ (https://youtu.be/o3O-ip3IgZc) मध्ये अप्रतिम वापरले आहे.

हे वाद्य भारतात कसे आले ह्याचा इतिहास रोचक आहे. हे वाद्य अली बेन सौ एले ह्या फ्रेंच वादकाने भारतात आणले. हे वाद्य तसे आधुनिकच. ऍडॉल्फ सॅक्स (Adolphe Sax) नावाच्या बेल्जियन संगीतकाराने त्याची निर्मिती साधारण १८४० च्या सुमारास केली. म्हणून ह्याला Saxophone असे म्हणतात. अली बेन १८५१ ते १८५८ पर्यंत म्हैसूरच्या राजाच्या पाश्चिमात्य वाद्यवृंदाचा director होता. म्हणजे हे वाद्य निर्माण झाल्याच्या १० वर्षाच्या आत हे वाद्य भारतात आले. असे मानतात की अली बेनने काही भारतीय वादकांना हे वाद्य शिकवले. म्हैसूरच्या राजाच्या वाद्यवृंदात हे वाद्य तेव्हा पासून आहे.

ऍडॉल्फ सॅक्सने सर्वच म्हणजे ही प्रकारच्या Saxophone निर्मिती केली आणि पेटंट पण मिळवले. हीच प्रकार आजही थोड्या फार बदलाने जगात दिसतात. स्वतः ऍडॉल्फ सॅक्सने ह्या वाद्याचा बराच प्रसार केला. हे वाद्य लगेच लोकप्रिय झाले आणि युरोपात मिलिटरी बँड आणि Orchestra मध्ये वापरायला लागले. पण हे वाद्य १८९० सुमारास युरोपातून लुप्त झाले किंवा वापर कमी झाला. पुढे १९१० नंतर हे वाद्य अमेरिकन वादकांनी अजुन Jazz Band मध्ये वापरायला सुरुवात केली आणि ह्या वाद्याचा जगभर प्रसार सुरु झाला.

आपल्या भारतात प्रकारचे Saxophone प्रामुख्याने दिसतात. Soprano, Alto आणि Tenor. ह्या तीन प्रकारच्या वाद्याच्या आवाजात काय फरक आहे हे कळायला अजून माझे कान परिपक्व झाले नाही. Kenny G. हा प्रसिद्ध वादक Soprano वाजवतो. बऱ्याच Restaurant मध्ये संध्याकाळी मंद आवाजात Kenny G च्या Soprano Saxophone वरील धून तुम्ही ऐकल्या असतील.

दक्षिणेत ह्या वाद्याचा कर्नाटकी संगीतात आत्मसात करण्याचे प्रयत्न झाले. नुकतेच निधन पावलेले कादरी गोपालनाथ कर्नाटकी संगीतात Saxophone वाजवणारे प्रसिद्ध आहेत. त्यांनी कर्नाटकी संगीत saxophone वर जगभर नेले. त्यांना सुद्धा म्हैसूरच्या राजाच्या वाद्यवृंदातील एका वादकाने Saxophone शिकवले.

रा. स्व. संघाच्या घोषात शृंग दलाची सुरुवात पुण्यात साधारण १९५० च्या सुमारास झाली. Saxophone शृंग दलातील एक महत्वाचे वाद्य. आज शृंग दल भारतभर विस्तारले आहे. संरक्षण क्षेत्र सोडून नागरी क्षेत्रात प्रांगणीय संगीतात संघाजवळ सर्वात जास्त वादक असतील. कदाचित रा. स्व. संघाजवळ सर्वात जास्त Saxophone वादक असतील. एक घोष वादक म्हणून मला ह्या वाद्याचे नेहमीच कुतुहल राहले आहे.  

सतीश गुंडावार

२९-नोव्हेंबर २०१९

No comments:

Post a Comment