Friday 27 December 2019

ऋषिदा

गेल्या ३०- सप्टेंबरला ऋषिकेश मुखर्जी ह्यांचा स्मृतिदिन होता. ऋषिदा हे हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वांचेच आवडते निर्देशक. आनंद, अभिमान, चुपके चुपके, खुबसुरत, नमक हराम, गोलमाल, नरम गरम, गुड्डी, बेमिसाल, मिली आणि बरेच सिनेमे बघत आपण मोठे झाले आहोत. व्यावसायिक हिंदी चित्रपट जेव्हा action movies किंवा Love stories वर केंद्रित होता. सर्व आघाडीचे अभिनेते जेव्हा action movies किंवा Love stories करायचे. सिनेमातला हिरो एक तर खुप श्रीमंत किंवा खुप गरीब किंवा अनाथ असायचा आणि सामान्य प्रेक्षक स्वतःला हिरोबरोबर जोडू शकत नव्हता. सामान्य प्रेक्षकाला त्या हिरोंसारखे रहाण्याचे स्वप्न जरूर पडायचे पण स्वतःसारखा हिरो मात्र त्यांना चित्रपटात दिसत नव्हता. साठ ते ऐंशीच्या दशकात एकीकडे big budget व्यावसायिक चित्रपट तर दुसरीकडे small budget art movies होते. ह्या दोन टोकांमध्ये सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून निखळ मनोरंजनासाठी चित्रपट करणारे काही दिग्दर्शक झालेत त्यात ऋषिदा अग्रस्थानी होते. आनंद मधला मृत्यु जवळ आलेला एक सामान्य माणूस उरलेले आयुष्य आनंदात जगण्याची धडपड असो, अभिमान मधली मोठी गायिका होतांनाचा नवऱ्याचा अहंकार सहन करणारी सामान्य घरातली मुलगी असो, चुपके चुपके मधील दोन प्रोफेसर ची निखळ situational commedy असो, किंवा बेमिसाल मधली दोन मित्रांमधली शुद्ध मैत्री असो. अश्या सर्व चित्रपटात ऋषिदांनी सामान्य व्यक्तिरेखा घेत सामान्य परिस्थितीवर आधारीत अनेक चित्रपट केलीत. ऋषिदांच्या चित्रपटात सामान्य माणसाला आपले स्वतःचे प्रतिबिंब दिसले. स्वतः गणित आणि रसायनशास्त्राचे शिक्षक असल्याने त्यांनी त्यांच्या चित्रपटात जीवनाचे गणित आणि रसायनशास्त्र अगदी अलगदरित्या मांडले. ऋषिदांच्या एका मुलाखतीत मी ऐकले की लोकांचे मनोरंजन करणे हाच एक उद्देश. म्हणून चित्रपटात विनोद आणि संगीत ह्याला अग्रस्थान. मग आनंद सारख्या गंभीर चित्रपटात पण विनोदाचा आवश्यक dose होताच. मी त्यांचा कोणता चित्रपट पहिल्यांदा बघितला ते आठवत नाही. पण बेमिसाल केव्हा बघितला ते आठवते. मी दहावीत होतो. माझ्या आई बाबांना वाटले असेल की पोरगा दररोज अभ्यास करून कंटाळला असेल. ते दोघे मला change म्हणून बेमिसाल बघायला घेऊन गेलेत. त्यातला सखी हा शब्द इतका रुतला की  पुढील ३ दिवस माझा अभ्यास बोंबलला.
त्या काळात एक निर्देशक एकाच संगीतकाराबरोबर काम करायचे. त्यात काही चुकीचे नाही. आपला पण आवडीचा एक ब्रँड असतोच ना आणि बदलण्यास आपण पण लवकर तयार होत नाही. तसेच निर्देशक मंडळींचे असू शकते पण ऋषिदा ह्याला अपवाद होते. ऋषिदा स्वतः एक उत्तम सतार वादक होते. त्यामुळे संगीताची उत्तम जाण होती. R. D. बर्मन त्यांचे आवडते संगीतकार असतील पण त्यांनी हेमंतकुमार, शंकर-जयकिशन, सलील चौधरी, सचिन देव बर्मन, वसंत देसाई, मदनमोहन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, जयदेव, रवींद्र जैन, चित्रगुप्त, उषा खन्ना आणि बप्पी लहरी सुद्धा आपल्या चित्रपटात वापरले. ह्या अभिनेत्यासाठी हा गायक असा industry मधील नियम पण त्यांनी पाळला नाही. आनंद मध्ये राजेश खन्ना साठी मन्ना डे चा आवाज 'जिंदगी कैसी ये पहेली हाये' https://youtu.be/3vgDb4TQneA आणि 'कही दूर जब दिन ढल जाये' https://youtu.be/kooq2WqEdG8 मध्ये मुकेश चा आवाज वापरला तर अभिमान मध्ये अभिताभ बच्चन साठी तेरी बिंदिया रे' https://youtu.be/M43y1Hodn2c मध्ये मोहम्मद रफींचा आवाज, तर चुपके चुपके मध्ये धर्मेंद्र साठी 'बागोमे कैसे ये फुल खिलते हैं' https://youtu.be/Esuu2R3V_Uc मुकेश चा आवाज वापरला. असा विचार करणे आणि तो प्रत्येक्षात करणे हे म्हणजे धाडसच म्हणायचे. नवीन गायकाचा प्रयोग तर वारंवार केला. रंग बिरंगी मध्ये पं. वसंतराव देशपांडेंचा आवाज ओम प्रकाश साठी 'मृग नयनी चंद्रमुखी' https://youtu.be/-eHyzXb94Fk मध्ये वापरला. हे गाणे ऐका तुम्हाला वाटेल की स्वतः ओम प्रकाशच गात आहेत असे वाटेल. गुड्डी मध्ये जया भादुरी साठी वाणी जयराम चा आवाज 'हम को मन कि शक्ती देना' https://youtu.be/NbchuCfqBls मध्ये वापरला. मला त्यांचे खूबसूरत मधील 'पिया बावरी पिया बावरी' https://youtu.be/xfUwSvM2wAw नमक हराम मधील 'दिये जलते हे फुल खिलते हे' https://youtu.be/17AXtxleQZk  मिली मधील 'बडी सुनी सुनी है' https://youtu.be/r5JiZdaLZ8M गाण्याची सुरवात कडव्याने आणि ध्रुवपद कडव्यानंतर अशी गंमत आहे ह्या गाण्याची. गोलमाल मधील आने वाला पल जाने वाला हे' https://youtu.be/AFRAFHtU-PE बेमिसाल मधील ' री पवन ढुंडे किसे तेरा मन' https://youtu.be/Cu2zpXIBWKI ही गाणी फार आवडतात. तुम्हाला पण नक्कीच आवडत असणार.
ऋषिदांची एक गोष्ट मला फार भावते. राज कपूर, राजेश खन्ना, अभिताभ बच्चन, धर्मेंद्र हे जेव्हा सुपरस्टार होते तेव्हा त्यांच्या कडून आम जनतेसाठी तयार केलेल्या चित्रपटात सामान्य नायकाची व्यक्तिरेखा करवून घेतली. ह्यात ह्या सुपरस्टारचा पण मोठेपणा दिसतो आणि ऋषिदाचा किती  मोठा मान  त्या वेळी चित्रपट सृष्टीत होता हे दिसून पण येते.
 
सतीश गुंडावार
-ऑक्टो-२०१९

No comments:

Post a Comment