Sunday, 28 August 2022

भंडारदरा

बऱ्याच वर्षात मी आणि रूपा दोघेच कुठे फिरायला गेलो असे झाले नव्हते. २००९ पासून मुलांचे दहावी, बारावीचे घरी वेध होते तर गेली दोन वर्षे करोनानी घालवली. रूपा परीक्षेसाठी नाशिकला गेली होती. तो योग साधून आम्ही भंडारदराला दोन दिवस जायचे ठरवले. २६ ऑगस्टला भल्या पहाटे निघून नाशिक गाठले आणि रुपाला घेऊन भंडारदऱ्याला पोहचलो.

भंडारदऱ्याला ब्रिटिश कालीन १९११ साली बांधलेले मातीचे धरण आहे. पावसाळ्यात धरणातील अधिकचे पाणी सोडतात. ते नैसर्गिक दगडावर पडून छत्री सारखा आकार होता म्हणून umbrella fall असे म्हणतात. पुढे धरणाचे spillway gate आणि त्यामागे प्रवरा नदीचे अथांग back water. पावसाने जरा सवड काढल्याने पाणी अत्यंत शांत होते. प्रचंड खोल पाण्यात बोटींग करणे हा वेगळाच आनंद. 

२६ ऑगस्टला पोळा होता. आमच्या घरी पोळा हा सर्वात मोठा सण. पोळ्याच्या दिवशी घरी नाही असे पहिल्यादा होत होते. रस्त्यावर पोळ्यावरून परतलेले सजवलेले बैल बघून पोळा साजरा केला. बैला सोबत फोटो काढून शेतकऱ्याला बोजारा दिला.

भंडारदऱ्यात असंख्य धबधबे आहेत. थोडे पुढे गेल्यावर रांधा धबधबा. रांधा धबधबा नदीवर असल्याने वर्षभर असतो. त्या परीसरात दोन धबधबे आहेत. सरकारने सुरक्षेसाठी पुल बांधले आहेत. धबधबा न चुकता बघा. धबधब्यावरून परत येतांना संध्याकाळ झाल्याने हाॅटेलवर येऊन पडलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी पश्चिम दिशेने प्रवासाला सुरुवात केली. गाडी धरणाच्या back water कडे कडेने जाते. डाव्या बाजूला back water आणि उजव्या बाजूला भव्य सह्याद्री. ढगांनी आच्छालेली सह्याद्रीची असंख्य शिखरे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाताच्या छोट्या छोट्या वाड्या. निसर्गाच्या अश्या स्वच्छ सौंदर्याने पुण्यातल्या धकाधकीच्या जीवनातला त्राण लगेच दुर केला!

कोकणकडा करत आम्ही सांदण दरीला आलो.‌ आशियातील नं. दोनची दरी. पावसाळ्यात फक्त दरीच्या मुखापर्यंत जाणे शक्य होते पण हिवाळा आणि उन्हाळ्यात लोक १.५ कि.मी ही लांब दरीत trek करायला येतात.

पुढे १२ व्या शतकातील अमृतेश्वर शीव मंदिर येते. ह्या आदिवासी भागात राज्याने असे सुंदर मंदिर का बांधले असावे हा प्रश्न पडतो. मंदिराच्या बाहेर सासू सुनेचे एक घरगुती भोजनालय आहे. तिथे आम्ही बाजरीची भाकरी, पिठलं, शेव भाजी आणि दफ्तरी तांदळाचा भात असे जेवण केले. दफ्तरी तांदूळ हा स्थानिक भात आहे. अतिशय सुचकर आहे.

पुढे नेकलेस धबधबा, नानी धबधबा येतो. थोडक्यात उरकून टाकला. मध्येच एक अज्ञात धबधबा मिळाला. सहज दिसत नाही. पण आमच्या ड्रायव्हरला पायऱ्या दिसल्या. धबधबाच्या मागे सहज पणे प्रवेश करता येतो. आम्ही त्याचे बाहुबली असे नामकरण केले.

पुढे येणारे वसुंधरा आणि कोलटेंभे ही दोन्ही धबधबे भव्य आहे. न चुकता बघण्यासारखे धबधबे आहेत. वसुंधरा धबधबा सुरक्षित आहे. दोन्ही धबधब्यात मनसोक्त भिजता येते. हे सर्व ठिकाणे संध्याकाळपर्यंत झाली.

ह्या संपूर्ण सहलीत काही विचार वारंवार आले. कॅलिफोर्नियाच्या यसोमिटीली कित्येकदा गेलो. स्वित्झर्लंडला ॲल्प्स बघितला. ती पण सुंदरच आहेत परंतु सह्याद्रीच्या सौंदर्याची भव्यता त्यांच्यापेक्षा फारच मोठी आहे. असे असून सुद्धा आंतरराष्ट्रीय पर्यटक तर एकही दिसला नाही. परप्रांतीय पर्यटक पण नगन्यच. फारच तूरळक वर्दळीचे काय कारण असावे? मी पुण्यात गेले ३० वर्षे रहात असून आम्ही इथे आत्ता का आलो ह्याची पण खंत वाटली. 

भंडारदऱ्याची भौगोलिक माहिती न घेता आल्याने थोडे नियोजन बिघडले. कळसूबाईचे शिखर जवळच आहे हे तिथे गेल्यावर कळले. आज म्हणजे २८ ऑगस्टला कळसूबाईचे शिखर चढण्याचा प्रयत्न केला. पण आणलेले शूज आणि वेळ बघून एक तासाचा trek करून मागे फिरलो आणि पुण्याला परतायला सुरुवात केली.

साधारण एक वाजता ओतूरला पोहचलो. मुख्य रस्त्यावर गाढवे मेस दिसली. शुद्ध शाकाहारी असल्याने बाजूला चौकशी करून जेवायला गेलो. जेवणात मासवडी (ह्या पदार्थाचे असे नाव का ठेवले हे न समजण्यासारखे आहे), शेंगदाण्याची चटणी, शेव, रस्सा आणि पोळी. शेवटी इंद्रायणी तांदळाचा भात आणि साधे वरण असे जेवण मी पहिल्यांदाच जेवलो.

भंडारदरा सर्वार्थाने पुरेपूर पर्यटन स्थळ आहे. Trekking च्या तयारीने आल्यास एक दिवस रतनगड, एक दिवस कळसूबाईचे शिखर trekking करता येईल आणि एक दिवस भंडारदराच्या आजुबाजुचे धबधब्यांचा आनंद घेता येईल. भंडारदऱ्यात MTDC चे रिसाॅर्ट आहे. ते मिळाले तर उत्तमच नाहीतर homestay चांगले आहेत.

सतीश गुंडावार
२८ ऑगस्ट २०२२

1 comment:

  1. सुरेख प्रवास वर्णन. राजकीय विषयावर लेखन / अभिप्राय देणाऱ्या लेखका कडून प्रवास वर्णनाचा पहिला प्रयत्न अतिशय उत्तम.

    शीतल दासरवार

    ReplyDelete