Saturday, 25 April 2020

हेमंतदा

मागच्या लेखात लिहल्यानुसार, आज हेमंतदांच्या गायकीवर लिहणार आहे. मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे सलिलदा म्हणत की देवांचा आवाज हा हेमंतदां सारखा असणार. हेमंतदांचा आवाज अगदी वेगळा, धीरगंभीर, प्रामाणिक आणि सात्विक होता. स्वतः उत्कृष्ट संगीतकार असूनही त्या काळातील सर्व नावाजलेल्या संगीतकारांनी हेमंतदा कडून खूप चांगली गाणी गावुन घेतली आहे. माझे सर्वात आवडते त्यांचे गाणे म्हणजे हेमंतदा निर्मित आणि संगीत दिलेला 'कोहरा' ह्या रहस्यमय चित्रपटातील 'ये नयन डरे डरे'. https://youtu.be/2gMhbWeo30o हे अगदी सूक्ष्म गाणे प्रत्येक ओळीत ते शब्द आणि ते अक्षरे आहेत. पण हेमंतदांच्या गायकीने हे गाणे भव्य केले. हेमंतदांचे गाणे म्हटले की कमीतकमी वाद्यात गायकीला प्राधान्य देत गाणे केले आहे. गाण्याचे पार्श्वसंगीत अत्यंत साधे आणि सरळ आहे. गाण्याचे शब्द, हेमंतदांची गायकी आणि वहिदा रहमानच्या अभिनयाने ह्या कृष्णधवल गाण्यात असंख्य रंगाची उधळण केली आहे. ह्या गाण्यात वहिदा रहमान ह्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव फारच स्वच्छंद आहेत. असा romantic अभिनय हल्ली कोणी करणे म्हणजे अशक्यच. कित्येकजण म्हणतात की हेमंतदा आठवले की सर्वात पहिले हे गाणे आठवते. गेले काही दिवस मी हे गाणे रोज ऐकत आहे. गाण्याचा hangover दुसऱ्या दिवसापर्यंत राहतो!

हेमंतदांचा आवाज गंभीर असला तरी त्यांनी श्रुंगाररसातील प्रेम गीते खूप गायली आहेत. बीस साल बाद’ ह्या हेमंतदा निर्मित आणि संगीत दिलेल्या चित्रपटातील 'बेकरार करके हमें यु ना जायीये' https://youtu.be/xpIJQri622A गाण्याला हेमंतदांचा स्पर्श आणि कोणतेही प्रचलित तालवाद्य गाण्यात नाही. गिटारच्या दोन बीटवर संपुर्ण गाणे रचले आहे. Interlude मध्ये Accordion चा छोटासा तुकडा गाण्याला रंजक करते. अजून एकदा विश्वजीत आणि वहिदा रहमान ह्यांच्या जोडीने प्रेमीयुगलांचे सुंदर भाव ह्या गाण्यात दिले आहेत. सचिनदाने तयार केलेले 'ना तुम हमें जानो ना हम तुमे जाने' https://youtu.be/LFa9nAq68Wk देव आनंद आणि पुन्हा एकदा वहिदा रहमान ह्यांच्या अभिनयात प्रेमीयुगलांची आतुरता आणि आकर्षण ह्यांचे समर्पक चित्रीकरण ह्या गाण्यात आहे. शंकर जयकिशनने तयार केलेले 'याद किया दिल ने कहा हो तुम' https://youtu.be/PvwnvoUOa-Q हे गाणे ऐकले की हेमंतदांचे संगीत वाटेल असे साधे आणि सरळ संगीत ह्या गाण्याला आहे. देव आनंद आणि उषा किरण ह्यांनी प्रेमीयुगलांचा स्वच्छंदपणा दोघात अंतर ठेवून दाखवले आहे. नायक नायिकेचे असा romantic अभिनय हल्ली दुर्मिळच.

विरह गीतांसाठी हेमंतदांचा आवाज तर स्वाभाविक वाटतो. त्यांनी असंख्य विरह गीत गायली आहेत. 'अनुपमा' ह्या हेमंतदांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील 'या दिल की सुनो दुनियावालो' हे गाणे धर्मेंद्रवर चित्रित केलेलं आहे. https://youtu.be/poXBa76JNKk धर्मेंद्र कोणतीही हालचाल न करत एकाच जागेवर उभे राहून आपल्या मनातील भावना व्यक्त करतो. गाण्याला कोणतेही प्रचलित तालवाद्य नाही. गिटारच्या एका बीटवर संपूर्ण गाणे रचले आहे अशी किमया हेमंतदांनी केली आहे. गुरुदत्त ह्यांच्या 'प्यासा' ह्या चित्रपटातील सचिनदांनी संगीत दिलेल्या 'जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला'. गाण्याला हेमंतदांनी संगीत दिले असेल असा भास होतो. हेमंतदा निर्मित आणि संगीत दिलेल्या 'खामोशी' ह्या चित्रपटातील 'तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है’ https://youtu.be/Oo3bE64YJig. ह्या गाण्यात वहिदा रेहमानच्या द्विधा मनःस्थितीचे रेखाटन फारच मार्मिक आहे. हे अजून एक गीत आहे की प्रेक्षक हेमंतदा म्हटले की हे गाणे सांगतात. सी. रामचंद्र ह्यांनी संगीत दिलेल्या 'अनारकली' ह्या चित्रपटातील 'जाग दर्द ए इश्क जाग’ ह्या गाण्याची सर्व मूल्ये उच्च दर्जाची आहेत.

शास्त्रीय संगीतावर आधारित काही उत्कृष्ट गाणी हेमंतदांनी दिली आहेत. कित्येक गाण्यात प्रचलित तालवाद्य न वापरणारे हेमंतदा ह्यांनी 'चली गोरी पी से मिलन को चली' https://youtu.be/eJzaXWfmu0A ह्या गाण्यात तबला वापरला आहे. ह्या गाण्यावर मीनाकुमारीने सुंदर कथ्थक नृत्य केले आहे. मीनाकुमारीचे नृत्य बघायला आणि हेमंतदांची गायकी ऐकायला हे गाणे दोनदा बघाल अशी मला खात्री आहे. आणि वसंत देसाईंनी केलेले 'नैन सो नैन नाही मिलाओ' https://youtu.be/L6kNKzN3zPo हे गाणे. ह्या संथ गाण्यात एक विलक्षण ठेहराव आहे आणि त्यात संध्या आणि गोपीकृष्ण ह्यांचा संथ नृत्य फारच आकर्षक आहे.

हेमंतदांची उडत्या चालीवरची तशी गाणी कमीच पण सचिनदांनी केलेले 'हे अपना दिल तो आवारा' हे गाणे सर्वांच्या ओठावर आहे. हेमंतदांची इतर लोकप्रिय गाणी, 'शर्त' ह्या चित्रपटातील हेमंतदांनी केलेले 'न ये चांद होगा ना तारे रहेंगे'. सचिनदांनी केलेले 'ये रात ये चांदनी फिर कहा सून जा दिलकी दास्तां' आणि बरीच अशी सुंदर गाणी.

हेमंतदांचा सुवर्णकाळ ५० ते ७० च्या दशकातला. ह्या लेखातील गाणी ५५ ते ७० वर्षे जुनी आहेत पण आजही चोखंदळ रसिकांच्या हृदयात अजूनही जागा करून आहेत. बहुतांश गाणी कृष्णधवल पण रंगाची कमतरता कुठेही भासत नाही. ही सर्व गाणी आजच्या पिढीच्या जन्माच्या आधीची किंवा त्यांच्या अगदी बालपणीची आहेत. इतकी वर्षे गाणी लोकप्रिय राहणे हे त्यांच्या उच्च गायकीची आणि संगीतकाराची प्रचिती देते.

सतीश गुंडावार
२५ एप्रिल २०२०

Sunday, 19 April 2020

हेमंत कुमार

एखादी शास्वत गोष्ट समजायला किंवा आवडायला एक प्रगल्भता लागते. ती कोणाला लवकर तर माझ्यासारख्यांना जरा उशिराच येते. असेच काहीतरी माझे हेमंतदा बद्दल झाले. इतकी वर्षे त्यांची गाणी ऐकत आलो पण त्यांची गायकी आणि संगीत समजायला जरा उशीरच झाला. हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळात एक व्यक्ती महान गायक आणि तितक्याच ताकतीचे संगीतकार आहे तसे थोडेच लोक. पण दोन्ही प्रवास करणारे हेंमतदा हे त्यात सर्वश्रेष्ठ म्हटले पाहिजे. मी जेव्हा हेंमतदा वर लिहायचे ठरवले तेव्हा त्यांनी गायलेली काही गाणी डोळ्यासमोर होती. पण जेव्हा थोडा शोध सुरु केला तर मी पहिले गोंधळलो की हेंमतदाच्या गायकीवर लिहायचे की संगीतकारवर लिहायचे? हेमंतदा उत्कृष्ट गायक की उत्कृष्ट संगीतकार असा माझा गोंधळ उडाला. एका पत्रकाराने हा प्रश्न त्यांच्या मुलांना विचारला. ते पण गोंधळले पण त्यांनी गायक असे उत्तर दिले. हेंमतदा जेव्हा गेलेत तेव्हा सत्यजीत रे म्हणाले की आज दुसऱ्यांदा रवींद्र संगीताचा मृत्यु झाला. महान संगीतकार सलिलदा म्हणत की देवांचा आवाज हा हेंमतदा सारखा असणार. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर मी देणे म्हणजे सूर्याला काजवा दाखवण्यासारखे होईल. माझा गोंधळ कमी करण्यासाठी मी ठरवले की हेंमतदाची ही दोन रूपे स्वतंत्रपणे मांडावीत म्हणून हेंमतदा वर दोन लेख लिहायचे ठरवलेहा लेख हेमंतदांचा संगीतकार म्हणून काय योगदान ह्यावर असेल.

हेमन गुप्ता ह्या त्यांच्या निर्देशक मित्राने त्यांना १९५२ मध्ये मुंबईला आणले आणि त्यांना आनंदमठ’ हा चित्रपट दिला. पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारे हेमंतदा ह्यांनी ह्या चित्रपटात लतादिदी कडून 'वंदे मातरम' (https://youtu.be/oi1h7JNncOA ) गावून घेतले. हे गाणे बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या चालीत गायले आहे पण आजही जनमाणसावर हेमंतदानी दिलेली चाल कोरली आहे. हेमंतदानी लतादिदीकडून काही चिरस्मरणीय गाणी गावून घेतलीत. त्यात 'कही दीप जले कही दिल', (https://youtu.be/nLDGwmJl9zI ) 'मेरा दिल ये पुकारे आजा', (https://youtu.be/mr_n9R3E_w4 ) 'हमने देखी है उन आंखोकी मेहकती खुशबू', (https://youtu.be/doPtBhDTpj0 ) 'छुप गया कोई रे दूर से पुकारके', (https://youtu.be/9tlOaMQrhI8 )  'धीरे धीरे मचल हे दिल बेकरार', (https://youtu.be/e3RiMIAZ1vY ) 'कुछ दिल ने कहा कुछ भी नही', (https://youtu.be/69dnqIFfrnE ) ' बेकरार दिल',  'झूम झूम ढलती रात', (https://youtu.be/eArec8UyNh0) 'सपने सुहाने लडकपन के', (https://youtu.be/l8mvptaIwXE ) अशी अवीट गाणी हेमंतदानी लतादिदीकडून करून घेतली. हेमंतदांनी १९५४ मध्ये 'नागिन' ह्या चित्रपटाला संगीत दिले. ह्या चित्रपटात 'मन डोले मेरा तन डोले'  (https://youtu.be/cvOD8GZ7reo ) ह्या गाण्यात त्यांनी बीन वाजवली आहे ती आजही लोकप्रिय आहे. आज समाजात नाग आणि ही बीन एक समीकरण झाले आहे.

हेमंतदा स्वतः उत्कृष्ट गायक असून सुद्धा गाण्या अनुरूप गायकांकडून गाणी गावून घेतली. कवी प्रदीप वर जेव्हा मागे लिहले होते तेव्हा जागृती’ ह्या चित्रपटाबद्दल लिहले होते त्या चित्रपटाचे संगीत हेमंतदानी दिले आहे. कवी प्रदीपने स्वतः गायलेले गाणे 'आवो बच्चो तुम्हे दिखाये झाकी हिंदुस्तानकी', (https://youtu.be/XiiBsKU4z6c ) आणि रफींनी गायलेले 'हम लाये हे तुफानसे किश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चो संभाल के’, ही गाणी देशभक्ती गीत म्हणून आपण आजही ऐकतो. रफींनी सुद्धा हेमंतदा बरोबर खूप गाणी गायली त्यात ' रात के मुसाफीर चंदा जरा बता दे', (https://youtu.be/rUAEFAXcVFg ) 'बृन्दावन का कृष्ण कन्हैय्या सबकी आंखोका तारा' ही विशेष लोकप्रिय आहेत.

हेमंतदानी गीता दत्त, आशाताई, किशोरकुमार, मन्ना डे आणि अनेक गायकांकडून गाणी गावून घेतलीत. गीता दत्त ह्याची काही उल्लेखनीय गाणी 'साहिब, बीबी और गुलाम' ह्या चित्रपटातील 'पिया ऐसो जीयामें समाए गयो रे', (https://youtu.be/tUn8NNFKXQs ) आणि 'ना जाओ सैय्या छूडाके बैय्या कसम तुम्हारी मैं रो पडुंगी'. (https://youtu.be/TCDbIT13MRY ) त्याच चित्रपटातील आशाताई ह्यांचे 'साकीया आज मुझे निंद नही आयेगी' (https://youtu.be/RIRVQ4vJrY4 ) अप्रतिम आहे. गीता दत्त ह्याचे हेमंतदा बरोबर गायलेली ' ये चांद होगा तारे रहेंगे' (https://youtu.be/AfpMM6O1qsc ) आणि 'गुमसुम सा ये जहाँ ये रात ये हवा'  (https://youtu.be/pDjNi8NkrPA ) ही गाणी अप्रतिम आहे. त्यांनी किशोरकुमार कडून खामोशी’ ह्या चित्रपटात ' शाम कुछ अजीब थी ये शाम' (https://youtu.be/MDXFi3avqo0 ) हे गाणे गावून घेतले. तसेच किशोरकुमारचे हे 'हवा पे लिख दु हवा के नाम' गाणे आपण ऐकले आहे.

हेमंतदा चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते. गायक आणि संगीतकारा बरोबर त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती पण केली. 'बीस साल बाद', 'कोहरा', 'बीवी और मकान', 'खामोशी' ह्यांचे विशेष नाव घ्यावे लागेल. ह्या चित्रपटाचे संगीत हेमंतदाचे असणारच. हेमंतदांनी बरीच गाणी कैफी आझमी ह्यांच्या कडून लिहून घेतली. चोखंदळ वाचक ते का हे लगेच समजू शकतील. हेमंतदांनी इतर गीतकारांकडून पण गाणी लिहून घेतली पण हेमंतदा आणि कैफी आझमी ह्या दोघांनी अफलातून गाणी हिंदी चित्रपट सृष्टीला दिली आहेत. त्यांच्या संगीतावर रवींद्र संगीताचा पगडा दिसतो. शास्त्रीय संगीतावर बरीच गाणी हेमंतदानी केलीत. त्यांचे संगीत साधे, सरळ आणि शांत त्यात वाद्यांचा गोंगाट नाही. कमीतकमी वाद्यांचा वापर ते करत. गाण्यात एक ठेहराव असायचा. पाश्चात्य वाद्यांचा वापर पण केला पण ते fusion कडे ते वळले नाही. ही सर्व गाणी आवर्जून ऐका. मला खात्री आहे की शास्वत संगीत ऐकल्याची अनुभूती तुम्हाला येईल. तुम्हाला ही गाणी कशी वाटली हे जरूर मला कळवा.  ह्या लेखात तुमच्या लक्षात आले असेल की हेमंतदानी गायलेली गाणी मी दिली नाहीत कारण हेमंतदांच्या गायकीवर एक स्वतंत्र लेख येत आहे.  (क्रमश)

सतीश गुंडावार

१९-एप्रिल-२०२०

Saturday, 11 April 2020

कळस दिसू लागले

मागच्या आठवड्यात ब्राझीलचे पंतप्रधान श्री जैर बालसोनारो ह्यांनी जसे रामायणात हनुमान हिमालयातून संजीवनी बुटी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवतो त्याची आठवण करत भारताला Hydroxychloroquine साठी लागणारा कच्चा माल पुरवण्याची मदत करा अशी विनंती केली. त्याच दरम्यान अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष श्री डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी हेच औषध लवकर पुरवा अशी विनंती केली. देशाचे हीत बघत भारत सरकारने ह्या औषधीच्या निर्यातीवर निर्बंध घातले होते. ह्या पार्श्वभूमीवर ह्या दोन राष्ट्राध्यक्षांनी ही विनंती केली होती. भारत सरकारने जगाची कोरोना व्हायरस मुळे एकंदरीत स्थिती बघत भारताच्या शेजारी देशांना आणि ज्या देशांना ह्या औषधींची अत्यंत गरज आहे त्यांना ही औषधी पुरवण्याचे मान्य केले. सुरुवातीला श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष ह्यांनी भारताचे आभार मानले. दोन दिवसांपूर्वी ब्राझीलचे पंतप्रधान ह्यांनी त्यांच्या देशाला संबोधतांना श्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेचे आभार मानले. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष श्री डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी पण श्री नरेंद्र मोदी आणि भारताचे आभार मानले आणि म्हणाले की ह्या मदतीची आम्ही आठवण ठेवू. भारताने ब्राझील आणि अमेरिकेला हे औषध मोफत दिली नाहीत तरी ह्या देशाने भारताचे आभार का मानावे?

मागच्या आठवड्यात अशीच एक बातमी आली होती. फ्रान्सने चीनला मास्क पुरवण्याची विनंती केली तर चीनने आधी आमची 5G चे तंत्रज्ञान घ्या अशी अट टाकली होती. अश्या काही अटी भारताला पण ब्राझील आणि अमेरिकेला टाकता आल्या असत्या. पण भारताने तसे काही केले नाही. मित्रत्वाचे नाते मनात ठेवत, दातृत्वाचा भाव जोपासत, "मा फलेषु कदाचन" कृतीत आणून ही मदत केली. व्हाइट हाऊसच्या Twitter Handle ने श्री नरेन्द्र मोदी आणि PMO ला follow करायला सुरुवात केली. ह्या सर्व घटना असाधारण आहेत आणि भविष्य काळाच्या नांदी आहेत.
ह्या कोरोना व्हायरसने जगातील तंत्रज्ञानातील प्रगती, वैद्यकीय सेवेतील विषमता, आर्थिक दरी, सामाजिक दरी, धर्मातील भेद, नास्तिक आस्तिक द्वेष हे सर्व पुसून टाकले आहे. एखादा देश आर्थिक, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने जर प्रगत आहे म्हणजे तो देश ह्या महामारीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवू शकेल ह्या विश्वासाला ह्या संकटाने छेद दिला आहे. लष्करी शक्ती तर ह्यात कुठे बसतच नाही. आज अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी सारखे प्रगत आणि श्रीमंत देश ह्या महामारीवर नियंत्रण आणण्यात असमर्थ झाले आहेत. पण ज्या देशाने त्यांचे राष्ट्रीय आणि सामाजिक चारित्र्य दाखवले त्या देशांना ह्या महामारीवर काही प्रमाणात यश मिळत आहे असे दिसते. जपान, कोरिया आणि भारत असे काही देश विजयाच्या मार्गावर आहेत.

कोरोना संकट असे रूप घेईल ह्याची जगाने कधी कल्पना पण केली नव्हती. सारा देश ३ आठवडे बंद करावा लागेल असे भाकीत मोठमोठ्या विद्वानांना पण करता आले नाही. मोदींनी देशाला २२ मार्चला जनता कर्फ्यु पाळण्यास विनंती केली असो किंवा एप्रिलला रात्री वाजता मिनिटे घरची दिवे घालवून पणत्या लावण्याची विनंती केली असो त्याला जो प्रतिसाद कुटुंब, समाज, एक गाव, एक राज्य आणि सबंध देश देत आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे. गेल्या काही दिवसातील एकूणच देशबांधवांचे आचरण बघता आणि रा. स्व. संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सेवा भारती, विश्व हिंदू परिषद आणि असंख्य समाजसेवी संघटना गरजूंना राशन पुरवठा, अन्नपूर्णा योजना, पोलीसांना मदत, वैद्यकीय सेवेत मदत हे बघता ह्यात देशबांधवानी त्यांचे राष्ट्रीय आणि सामाजिक चारित्र्य नक्कीच दाखवले आहे. त्यात काही परीट असतील पण देशाच्या अग्निपरीक्षेला हे परीट आवश्यक आहेत ना. हे सर्व बघतांना एक संघाचे गीत आठवले. त्यात एक ओळ आहे ‘अगणित भगीरथांचे यास्तव अविरत व्रत चालले’ ह्या गीतात पुढे एक कडवे आहे ते ह्या सर्व वातावरणाचे समर्पक चित्र डोळ्यासमोर आणते.
||आव्हानाच्या पाषाणावर खोदू शिल्पे नवी
मरुभूमी वरीही ऐसे झिरपू फुटेल नवी पालवी
सद्भावाचे मांगल्याचे शिंग आम्ही फुंकले||
गेल्या काही महिन्यात काही जागतिक संघटनेचे वर्तन तसे काही समाधानकारक नाही राहिले. जेव्हा इटलीने युरोपियन युनियनला मदत मागितली तर ती दिली गेली नाही. इटली मध्ये सध्या युरोपियन युनियनच्या विरुद्ध जनमत तयार होत आहे. जनता युरोपियन युनियनच्या बाहेर पडा अशी मागणी करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ज्या प्रमाणे चीनची पाठराखण करत सर्व जगाला धोक्यात टाकले त्यामुळे बरेच देश नाराज आहेत. डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी उघडपणे WHO ला ह्या पुढे मदत मिळणार नाही हे घोषित केले. जपानने चीन मधून जपानी कंपन्या बाहेर पडतील अशी योजना बनवली आहे. UN किंवा WTO ह्या संघटनांचे ह्या संकट काळात जगाला हवे तसे मार्गदर्शन झाले नाही ही खंत बऱ्याच देशाने केली आहे. जागतिक समीकरणे ह्या महामारीमुळे बदलतील असे चित्र उभे राहात आहे. एकंदर भारताचे SAARC, G20 समुहात ज्या प्रकारचे वर्तन राहिले त्याची जगाने नोंद घेतली आहे, कित्येक देशाने भारताचे कौतुक केले आहे. हे बघता भारत अजून एकदा जगतगुरु होण्याच्या मार्गावर जात आहे असे आश्वासक चित्र दिसत आहे. हे बघत असतांना त्याच गीतातील अजून एक ओळ आठवते

||लक्ष पावलां सवे चालती लक्ष नवी पावले
दूर जरी ध्येयाचे मंदिर, कळस दिसू लागले।।

सतीश गुंडावार
११-एप्रिल-२०२०