Tuesday 30 May 2023

आभाळमाया


मी कराड इंजिनीरिंग मधून १९९० मध्ये पदवी घेतली. कराड तसे मध्यम आकाराचे शहर. एकदा काय कॉलेज सोडले तर त्या शहराला आणि कॉलेजला वारंवार भेट देणारे तसे मी कमी बघितले. पण कराड कॉलेजचे विद्यार्थी मला अपवाद वाटतात. गेल्या ३३ वर्षात कदाचित तितकेच वेळा मी कराडला गेलो असेल. कॉलेजचे आकर्षण एक भाग असला तरी आम्ही बरीच मित्रमंडळी देशपांडे काका आणि काकूंना भेटायला कराडला नक्की जातो.

जीवनात बरीच निःस्पृह, निस्वार्थी, परोपकारी, प्रेमळ, आदर्श मंडळी भेटतात. देशपांडे काका आणि काकू हे त्या पलीकडचे प्रकरण आहे. तसे काका, काकूंच्या घरचे कोणीच आमच्या कॉलेजमध्ये शिकले नाही. पण आमच्या अगोदरच्या बॅचचे आणि आमच्या नंतरच्या बॅचचे कित्येक विद्यार्थी त्यांच्या घरी कायम पडीक असायचे. आम्ही बरेच जण विदर्भातले होतो. घरापासून हजारो किलोमीटर दूर मनात आले की घरी जाता येत नसायचे. काका, काकूंना त्याची जाणीव असावी. त्या भावनेतून कित्येक विद्यार्थ्यांना त्यांनी घरची माया दिली. राणी आणि सुदर्शन ही दोन भावंडे त्यावेळी घरी असायची. ह्या दोघांनी काका काकूंच्या ह्या उपक्रमात मोलाची भर घातली. राणी आमच्यापेक्षा मोठी पण सुदु समवयस्क आहे. सुदु आमच्या मित्रपरिवाराचा एक भाग झाला होता की कित्येक जणांना तो आमच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे असे वाटायचे.

देशपांडे कुटुंब तसे मध्यमवर्गीय कुटुंब, शेतीच्या उत्पन्नावर कुटुंब चालायचे. तरी सुद्धा काकू प्रत्येकासाठी काहीतरी नेहमीच खायला करायच्या. हजारो किलोमीटर दूर राहणाऱ्यांना, मेस मध्ये जेवणाऱ्यांना घरच्या खाण्याचे महत्व काय असते हे फक्त अनुभवानंतर कळते. आमचे जेवण्याचे हाल होत आहे असे बघताच काका, काकूंनी आम्हाला त्यांच्या घराची एक खोली दिली, घरचे भांडे दिलेत आणि स्वतःची मेस सुरु करायला प्रोत्साहन दिले. “Lovely Eight” नावाची आम्ही आठ जणांची स्वसंचालित उत्तम जेवण देणारी मेस उभी राहिली. आमची मेस असली तरी काकू आमच्यासाठी काहीतरी पाठवायच्याच. काकू नेहमी ब्रेडचा उपमा करायच्या. गंजभर ताक तर नेहमीच असायचे. पिकल्या हापूस आंब्याचा साखरआंबा विदर्भातल्या लोकांना नवीनच होता. काकू नेहमी सढळ हाताने सर्वांना द्यायच्या. ब्रेडचा उपमा आणि पिकल्या हापूस आंब्याचा साखरआंबा ह्यांचा प्रवेश माझ्या घरी झाला आणि आजही आमच्या घरी हे पदार्थ होतो.

ह्या उपकारांची थोडी का होईना पण परतफेड करण्याच्या उद्देशाने आम्ही सारे लोक वारंवार कराडला जात असतो. काका, काकू आता नव्वदीत पोहचले आहेत. कोरोनाच्या काळात सर्वच थांबले होते. त्यामुळे गेले वर्षे कराडला जाणे झाले नाही. म्हणून ह्यावेळी आम्ही मित्रांनी ठरवून गेल्या रविवारी कराडला गेलो. त्यांच्या भेटीने मन प्रसन्न झाले. निःस्पृह, निस्वार्थी, परोपकारी, प्रेमळ, अन्नपूर्णा काका काकूंच्या गुणातून एक कणभर गुण जरी आपल्या वागण्यात आला तर त्यांच्या उपकारांची परतफेड होईल आणि कराडला परत येऊ ह्या भावनेने आम्ही परत फिरलो.

सतीश गुंडावार

३०-मे-२०२३

6 comments:

  1. Very nice Satish...Recalled Sweet memories of Karad Engg College days.

    ReplyDelete
  2. मस्त गुंडावर साहेब

    ReplyDelete
  3. सतीश, खूप छान दिवस होते ते. तू पुन्हा एकदा आठवणी जाग्या केल्यास.

    ReplyDelete
  4. खूप छान सतीश जी, Grattitude in Attitude हा गुण खूप कमी लोकांमध्ये बघायला मिळतो.

    ReplyDelete
  5. प्रेम , जिव्हाळा , आपुलकी , स्वभावातील लाघवी पणा आणि कृतज्ञता... खरंच ह्या सगळ्या गोष्टींना काही पैसे पडत नाही पण तरीही आज किती दुर्मिळ झाल्या आहेत.
    सतीश जी , ह्यातून बरेच काही घेण्यासारखे.
    आमच्या करिता असेच लिहीत रहा.

    ReplyDelete
  6. छान व्यक्ती चित्रण. जिवंत चित्र डोळ्यासमोर उभे राहते. अशी कृतज्ञता आपल्यालाच समृद्ध करते व सर्वांना आनंद देते.

    ReplyDelete