Sunday, 30 July 2023

गिटार Guitar

 


हिंदी चित्रपटातील अभिनेत्याच्या हातातील सर्वात आवडते वाद्य असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुमचे लगेच उत्तर गिटार असेल. क्वचितच असा अभिनेता असेल की ज्याने हे वाद्य घेऊन सिनेमा मध्ये गाणे गायले नसेल. गिटारचे नाव घेतले की कर्जचे theme music, शोलेचे title song, ‘दम मारो दम’, ‘पुकारता चला हूं मै’ ‘निले निले अंबर पर’, असे अनेक गाणी आपल्या ओठावर येतात. पडद्यावर तर ते गाणे कुण्या एका अभिनेत्यावर दिसेल पण प्रत्यक्षात ते गाणे कोणी वाजवली असेल हा प्रश्न तुम्हाला कधी आला काय? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा माझा छोटा प्रयत्न!

चित्रपटात हिरोच्या हातात साधारणपणे Spanish guitar किंवा acoustic guitar दिसते. Bass Guitar किंवा Hawaiian guitar हिरोच्या हातात कधी दिसत नाही. त्यामुळे ह्या लेखाचा विषय Lead Guitar हे स्वाभाविक आहे. तसाही Bass Guitar मी स्वतंत्र लेख लिहिला आहे.

हिंदी चित्रपट गीतात गिटारचा वापर तसा फार जुना आहे. सुरवातीच्या काळात गोव्यातील गिटार वादकांचा दबदबा होता. गोव्यातील बरेच गिटारवादकांनी हिंदी चित्रपट गीतात गिटार वाजले होते. त्यांच्याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. त्यात Anibal Castro ह्यांचे नाव प्रथम घ्यावे लागेल. त्यांनी कोणत्या गाण्यात गिटार वाजवली याची माहिती मला मिळाली नाही. पण त्यांनी गोरख शर्मा यांना गिटार शिकवली. पुढे गोरख शर्मा ह्यांनी हिंदी चित्रपटात इतिहास रचला.

परंतु ह्या लेखाची सुरुवात दिलीप नाईक यांच्यापासून करायला हवी. “जान पहचान हो” या जगप्रसिद्ध गाण्यामधील गिटार दिलीप नाईक यांनी वाजवली आहे. त्यांनी शंकर जयकिशन आणि ओ.पी. नय्यर यांच्यासोबत प्रामुख्याने काम केले. नौशाद, एन. दत्ता, चित्रगुप्त आणि पंचमबरोबर सुद्धा थोडेफार काम केले आहे. शंकर जयकिशन सोबत त्यांनी केलेली काही उल्लेखनीय गाणी अशी आहेत. “तुम से अच्छा कौन है”, “आजा रे आ जरा”, “ये रात भिगी भिगी”, “नैनोवाली तेरे नयना जादू कर गये”, “देखो अब तो किसको नही है खबर”. ओ.पी. नय्यर यांचे जगप्रसिद्ध गाणे “पुकारता चला हूँ में” या गाण्यात गिटार दिलीपजींनी वाजवली आहे. ओ.पी. नय्यर सोबत त्यांनी खूप सुंदर गाणी केली आहेत. “आसमान से आया फरिश्ता”, “हुजुरेवाला जो हो इजाजत”, “ऐसा मोका फिर कहा मिलेगा”, “लाखों हें यहा दिलवाले” पंचमच्या तीसरी मंझिल ह्या चित्रपटाने हिंदी चित्रपट संगीतात एक नवीन क्रांती आणली. “आजा आजा मैं हू प्यार तेरा” मधील prelude मधील electric guitar दिलीपजींने वाजवली आहे. हा चित्रपट कदाचित एकच चित्रपट दिलीपजींने पंचम बरोबर केला असेल. दिलीपजींने बऱ्याचदा electric guitar वाजवली आहे. कधीकधी acoustic गिटार वाजवलेली दिसते. शंकर जयकिशन किंवा ओ. पी. नय्यरच्या गाण्यात गिटार ऐकू आली तर ती दिलीप नाईक ह्यांची असेल असे गृहीत धरायला काही हरकत नाही.

पंचमजवळ त्यांची dedicated गिटार team होती. भानूदास गुप्ता, भूपिंदर सिंग, रमेश अय्यर, सुनील कौशिक ही मंडळी पंचमजवळ electric, acoustic guitar, Hawaiian guitar वाजवायचे. शोलेचे title song (https://youtu.be/F7QXXwptYKU) भानुदाने वाजवली आहे. भानुदा बरेच वर्षे पंचमकडे गिटार वाजवायचे. भूपिंदरसिंग ह्यांना पण सुरुवातीला भानुदांनी मार्गदर्शन केले. पण त्यांनी कोणत्या कोणत्या गाण्यात वाजवले ही माहिती मिळत नाही. रमेश अय्यरच्या बाबतीत पण तसेच आहे. त्यांनी खूप वर्षे पंचम सोबत गिटार वाजवली पण विश्वसनीय माहिती मिळत नाही. “सागर जैसे आंखो वाली” हे सागर चित्रपटातील गाण्यातील prelude मधील acoustic guitar रमेश अय्यर ह्यांची आहे.

भूपिंदरसिंह हे गायक म्हणून चित्रपट सृष्टीत आले असले तरीही त्यांची गिटारवादक म्हणून कामगिरी खूपच उल्लेखनीय आहे. त्यांचे पहिले हिंदी गाणे ”रुतु जवा” हे त्यांनी गायले आहे, त्यांच्यावर चित्रित झाले आहे आणि त्या गाण्यात ते गिटार वाजवताना पण दिसतात. पुढे ते पंचमच्या टीम मध्ये गिटार वाजवू लागले “दम मारो दम” या गाण्यातील electric guitar त्यांनीच वाजवली आहे. Spanish guitar, 12 string guitar, Hawaiian guitar ते पंचमकडे वाजवायचे. पंचमकडे त्यांनी वाजवलेली काही उल्लेखनीय गाणी “चिंगारी कोई भडके”, “चांद मेरा दिल”, “यादों की बारात निकली”, “मेहबूबा मेहबूबा”, “आने वाला पल”, “आप की आँखों में कुछ महके”, “नही नही अभी नही”, “चला जाता हू”, “लेकर हम दिवाना दिल”. पंचमच्या गाण्यामध्ये प्रामुख्याने acoustic guitar दिसते, electric guitar अपवादानेच दिसते. भूपिंदरसिंगनी इतर संगीतकारांकडे सुद्धा गिटार वाजवली आहे. मदन मोहनसोबत “तुम जो मिल गए हो”, तर बप्पी लहरी सोबत “चलते चलते” हे गाणे त्यांनी केली आहेत.

लक्ष्मीकांत प्यारेलाल (LP) या संगीतकार जोडीमधील प्यारेलाल शर्मा यांचे धाकटे बंधू गोरख शर्मा ह्यांचे हिंदी चित्रपट गाण्यातील योगदान अतिशय उल्लेखनीय आहे. मूळचे मेंडोलिनवादक पुढे गिटार वादक झाले. त्यामुळे त्यांच्या गिटारवादनात मेंडोलिनची स्टाइल दिसते. Anibal Castro नी त्यांना गिटार शिकविली. कर्ज सिनेमा आठवला की त्यातील theme music (https://youtu.be/-UWMVc67Di8)  लगेच आठवते. ती त्यांनी रचली आणि वाजवली. लक्ष्मीकांत प्यारेलाल सोबत सुरुवातीपासून त्यांचे सहाय्यक म्हणून काम केल्याने, त्यांच्या प्रत्येक गाण्यातील गिटार गोरख भाईनी वाजवली आहे. पुढे नरसिम्हा ह्या चित्रपटात पण कर्ज सारखे theme music त्यांनीच केले. गोरख भाईनी मुख्यत्वे acoustic guitar वाजवली असली तरीही कधी कधी electric guitar पण वाजवली आहे. ते bass guitar पण वाजवायचे. “दम मारो दम” मध्ये भूपिंदर सिंगसोबत bass guitar गोरख भाईनी वाजवली आहे. त्यांच्या गाण्याची लिस्ट तर फार मोठी आहे पण काही उल्लेखनीय गाणी,”एक हसीना थी”, “नजर ना लग जाये’, “मैं शायर तो नहीं”, “रुक जाना नहीं”, “हम बने तुम बने” ही गाणी प्रसिद्ध आहेत. गोरख भाई अतिशय निष्णात वादक असल्याने त्यांनी इतर संगीतकारांकडे सुद्धा वाजले. शिव हरी कडे वाजवलेले डर चित्रपटातील “जादू तेरी नजर” आणि सिलसिला चित्रपटातील “ये कहाँ आ गए हम” मधील गिटार गोरखभाईंची आहे.

राजेश रोशन यांच्या गाण्यामध्ये अरविंद हळदीपूर तर बप्पी लहरी यांच्या गाण्यामध्ये ताबून सूत्रधार हे गिटार वाजवायचे. सुनील कौशिक पंचमसोबत इतर संगीतकारांकडे पण वाजवायचे. त्यांनी कल्याणजी आनंदजी कडे वाजवलेले “नीले नीले अंबर” या एकाच गाण्याने त्यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. गिटार वादकांची परीक्षा घेणारे गाणे मानले जाते.

या वादकांचे जितके कौतुक करावे तितके कमीच. तीन मिनिटाच्या गाण्यामध्ये साधारण 5 सेकंद ते 30 सेकंद यांना वाजवायला मिळायचे. तरी सुद्धा त्यांच्या वादनाने त्या गाण्याची ओळख तयार व्हायची. संगीतकाराचे, गायकाचे नाव तर आपल्याला माहिती असते. पण आपल्याला वादकांचे नाव माहिती नसते. वादकांना त्यांच्या योगदानाचे श्रेय मिळत नाही. त्यांना श्रेय मिळावे यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.

 

सतीश गुंडावार

३०-जुलै-२०२३

Friday, 28 July 2023

उडुपीच्या श्रीकृष्ण मंदिराचा महाप्रसाद


लहानपणी बाबांसमोर केलेल्या एखाद्या खेळणीचा किंवा सायकलीचा हट्ट जेव्हा काही दिवसांनी पुर्ण होतो आणि आपल्याला जसा आनंद होतो असाच काहीसा आनंद आज मला झाला. 

दहाएक वर्षांपासून उडुपीच्या श्रीकृष्ण मंदिराचा महाप्रसाद खाण्याची खुप इच्छा होती ती आज पुर्ण झाली 🙏🏻

आज सकाळी दोन तीन तास मंदिरात घालवले. अतिशय धार्मिक, सुख आणि शांती देणारे ते क्षण होते. 

हे सर्व झाल्यावर आम्ही कनकालयात प्रसाद घ्यायला गेलो. मंदिराची सेवा केली तर ते केळीच्या पानावर वेगळ्या दालनात प्रसाद देतात.

केळीच्या पानावर आधी पाणी टाकून स्वच्छ करायचे. सुरुवातीला भात आणि रस्सम. त्यासोबत एक वेगळ्या प्रकारचे घट्ट सांबार, काही चटण्या आणि वांग्याची भाजी. वांगेप्रेमी गुंडावारांना वांगे मिळाले तर अर्धे सुख तर इथेच मिळाले. अशी वांग्याची भाजी आजच खाल्ली. चिंच, गुळ टाकून केलेली काळपट भाजी अतिशय स्वादिष्ट होती. 

त्यानंतर भात आणि सांबार. कोहळ्याच्या (लाल भोपळा) मोठ्या फोडीचा सांबार पण आजच खाल्ला. त्यासोबत पुरणासारखा एक गोड पदार्थ दिला. बहुदा सर्व डाळी, तांदुळ आणि साखर असावे. त्यांनी कन्नड नाव सांगितले पण आठवेल असे नव्हते. 

त्यानंतर पायसम वाढले. संतुलित गोडवा असलेला पायसम पण आज पहिल्यांदाच खाल्ला. 

त्यानंतर रितीनुसार ताक भात खायचा असतो पण दोन वेळा भात घेतल्यावर तिसऱ्यांदा शक्य नव्हते. आम्ही फक्त ताक घेतले आणि ढेकर दिली.

श्रीकृष्णाचा प्रसाद असल्याने कांदा, लसूण न टाकलेले, अत्यंत श्रद्धेने शिजवलेले, अत्यंत प्रेमाने वाढलेले सात्विक भोजन केल्यानंतरचा आनंद व्यक्त करता येत नाही.

दहाएक वर्षांपासूनची इच्छा तृप्त झाल्यावर तेथील वाढणाऱ्या पुजाऱ्यांचे आभार मानत मंदिरातून बाहेर पडलो.

शेगाव, सज्जनगड येथील महाप्रसादाच्या आनंदानंतर हा तितकाच मौल्यवान आनंद आहे. सर्वांनी जरूर घ्यावा असा 🙏🏻🙏🏻🙏🏻

जय श्रीकृष्ण
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

सतीश गुंडावार
१७ मार्च २०२३

Thursday, 20 July 2023

तेरे लिये पलकों के झालर बुनु

गाण्यात rhythm, melody आणि harmony वेगळ्या नसून एकच आहे अशी जादू पंचमने (राहुल देव बर्मन) केली अशी बरीच गाणी आहेत.

आज असेच एक गाणं ऐकायला मिळाले. *तेरे लिये पलकों के झालर बुनु* कमीतकमी वाद्यात जास्तीत जास्त परिणाम करणारे संगीत ह्या गाण्याचे आहे.‌

Bass guitar हे गाण्याचे prelude आणि interlude  मध्ये melody, तर कडव्यात rhythm आणि गाण्यात सतत harmony चे काम करते अशी सुंदर रचना पंचमने केली आहे. 

Acoustic guitar, bass guitar, बासरीचा सुरेल prelude आणि interlude मध्ये संतूर, बासरी, acoustic guitar ची सुरेल गुंफन आहे.

१९८० च्या सुमाराचे गाणे आहे म्हणजे acoustic guitar रमेश अय्यरचे वाटते. खात्रीने सांगता येत नाही. पण bass guitar हे Tony Vaz चे नक्की असावे. तर संतुर उल्हास बापटांचे नक्की आहे.

गाण्याला strong bass line आहे त्यामुळे headset नक्की वापरा. संगीत ऐकताना शब्द लक्ष देऊन ऐकायचे विसरू नका. 😁

असे म्हणतात की लतादीदी प्रत्येक गाण्यात स्वतःची स्वाक्षरी करतात. ह्या गाण्यात पण आहे. तूम्हाला सापडली तर मला पण सांगा.

https://youtu.be/20Wg1ONGJqE

🙏🏻🙏🏻🙏🏻

Tuesday, 30 May 2023

आभाळमाया


मी कराड इंजिनीरिंग मधून १९९० मध्ये पदवी घेतली. कराड तसे मध्यम आकाराचे शहर. एकदा काय कॉलेज सोडले तर त्या शहराला आणि कॉलेजला वारंवार भेट देणारे तसे मी कमी बघितले. पण कराड कॉलेजचे विद्यार्थी मला अपवाद वाटतात. गेल्या ३३ वर्षात कदाचित तितकेच वेळा मी कराडला गेलो असेल. कॉलेजचे आकर्षण एक भाग असला तरी आम्ही बरीच मित्रमंडळी देशपांडे काका आणि काकूंना भेटायला कराडला नक्की जातो.

जीवनात बरीच निःस्पृह, निस्वार्थी, परोपकारी, प्रेमळ, आदर्श मंडळी भेटतात. देशपांडे काका आणि काकू हे त्या पलीकडचे प्रकरण आहे. तसे काका, काकूंच्या घरचे कोणीच आमच्या कॉलेजमध्ये शिकले नाही. पण आमच्या अगोदरच्या बॅचचे आणि आमच्या नंतरच्या बॅचचे कित्येक विद्यार्थी त्यांच्या घरी कायम पडीक असायचे. आम्ही बरेच जण विदर्भातले होतो. घरापासून हजारो किलोमीटर दूर मनात आले की घरी जाता येत नसायचे. काका, काकूंना त्याची जाणीव असावी. त्या भावनेतून कित्येक विद्यार्थ्यांना त्यांनी घरची माया दिली. राणी आणि सुदर्शन ही दोन भावंडे त्यावेळी घरी असायची. ह्या दोघांनी काका काकूंच्या ह्या उपक्रमात मोलाची भर घातली. राणी आमच्यापेक्षा मोठी पण सुदु समवयस्क आहे. सुदु आमच्या मित्रपरिवाराचा एक भाग झाला होता की कित्येक जणांना तो आमच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे असे वाटायचे.

देशपांडे कुटुंब तसे मध्यमवर्गीय कुटुंब, शेतीच्या उत्पन्नावर कुटुंब चालायचे. तरी सुद्धा काकू प्रत्येकासाठी काहीतरी नेहमीच खायला करायच्या. हजारो किलोमीटर दूर राहणाऱ्यांना, मेस मध्ये जेवणाऱ्यांना घरच्या खाण्याचे महत्व काय असते हे फक्त अनुभवानंतर कळते. आमचे जेवण्याचे हाल होत आहे असे बघताच काका, काकूंनी आम्हाला त्यांच्या घराची एक खोली दिली, घरचे भांडे दिलेत आणि स्वतःची मेस सुरु करायला प्रोत्साहन दिले. “Lovely Eight” नावाची आम्ही आठ जणांची स्वसंचालित उत्तम जेवण देणारी मेस उभी राहिली. आमची मेस असली तरी काकू आमच्यासाठी काहीतरी पाठवायच्याच. काकू नेहमी ब्रेडचा उपमा करायच्या. गंजभर ताक तर नेहमीच असायचे. पिकल्या हापूस आंब्याचा साखरआंबा विदर्भातल्या लोकांना नवीनच होता. काकू नेहमी सढळ हाताने सर्वांना द्यायच्या. ब्रेडचा उपमा आणि पिकल्या हापूस आंब्याचा साखरआंबा ह्यांचा प्रवेश माझ्या घरी झाला आणि आजही आमच्या घरी हे पदार्थ होतो.

ह्या उपकारांची थोडी का होईना पण परतफेड करण्याच्या उद्देशाने आम्ही सारे लोक वारंवार कराडला जात असतो. काका, काकू आता नव्वदीत पोहचले आहेत. कोरोनाच्या काळात सर्वच थांबले होते. त्यामुळे गेले वर्षे कराडला जाणे झाले नाही. म्हणून ह्यावेळी आम्ही मित्रांनी ठरवून गेल्या रविवारी कराडला गेलो. त्यांच्या भेटीने मन प्रसन्न झाले. निःस्पृह, निस्वार्थी, परोपकारी, प्रेमळ, अन्नपूर्णा काका काकूंच्या गुणातून एक कणभर गुण जरी आपल्या वागण्यात आला तर त्यांच्या उपकारांची परतफेड होईल आणि कराडला परत येऊ ह्या भावनेने आम्ही परत फिरलो.

सतीश गुंडावार

३०-मे-२०२३

Monday, 1 May 2023

रवि


कोणा एका विद्वानाने असे सांगितले की प्रतिभावान व्यक्तीचे समीकरण सांगायचे झाल्यास चार भागात विभागता येईल. त्याचे स्वप्न, इच्छाशक्ती, स्वप्नपूर्तीसाठी परिश्रम आणि त्याची बुद्धिमत्ता. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये या समीकरणावर आधारित अनेक व्यक्ती आपल्याला बघायला मिळतात. असेच एक संगीतकार रवि! कुठल्याही प्रकारचे शास्त्रीय संगीताचे औपचारिक प्रशिक्षण न घेता केवळ आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेले अचाट प्रयत्नांचे रवि म्हणजे मूर्तिमंत रूप. “चौदहवी का चाँद हो” किंवा “ऐ मेरी जोहरा जबी” ही गाणी कोणी ऐकली नाही असे म्हणणारा व्यक्ती कदाचितच सापडेल. पण जर विचारले की ह्या गाण्यांचे संगीतकार कोण? तर बरेच जण सांगू शकणार नाही. प्रत्येकच प्रतिभावान व्यक्तीला प्रसिद्धी मिळतेच असे नाही. अनेक पुरस्कार प्राप्त गाणी आणि चित्रपट देऊन सुद्धा रविंना हवी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही.

1950 मध्ये रवि यांचे लग्न झाले होते. त्यांनी 1942 चा बंगालचा दुष्काळ आणि महाभूकमारीचे दिवस बघितले होते. 30 लाख लोकं भूकमारीनी त्यावेळी मेली होती. अशा वेळी सरकारची सुरक्षित नोकरी सोडून आपले स्वप्न पूर्ण करायला रवि मुंबईला आले. सुरवातीची दोन वर्षे अत्यंत परिश्रमाचे, अडचणीचे आणि उपेक्षेचे. पण रविंनी आपली हिम्मत हारली नाही. शेवटी 1952 साली ‘आनंदमठ’ या चित्रपटात त्यांना संधी मिळाली. त्या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं “वंदे मातरम्” यात त्यांना कोरस मध्ये गायला मिळाले आणि त्यांचा हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रवास सुरू झाला. रविंचा हिंदी भाषेवर चांगले प्रभुत्व होते. आनंदमठचे संगीतकार हेमंत कुमार ह्यांना अशाच एका व्यक्तीची गरज होती. हेमंत कुमारांनी आपले असिस्टंट म्हणून रविंना ठेवले आणि पुढील 2 - 3 वर्षे रविंनी हेमंत कुमार यांची असिस्टंट म्हणून काम केले. हेमंतदा साठी प्रसिद्ध नागिन बिन रवि आणि कल्याणजी या दोघांनी मिळून वाजवली होती.

हेमंतदा बरोबरच्या कामाने त्यांना आर्थिक समृद्धी दिली. पण हेमंतदानी रविंची बुद्धिमत्ता लवकर ओळखली. दोन वर्षानंतर हेमंतदाने सुचवले की स्वतंत्र काम कर. मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनात एकदा काय आर्थिक स्थिरता आली की नवीन जोखीम ओढवून घ्यायची हिम्मत नसते. पण रविंनी ती स्वीकारली. 1955 पासून त्यांनी स्वतंत्रपणे संगीत द्यायला सुरुवात केली.

रविंनी इतके मधुर गीत आपल्याला दिलीत. पण हिंदी चित्रपट सृष्टीतील महान संगीतकारांच्या यादीत त्यांचे नाव लोकं सहसा घेत नाहीत. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी जर आपण बघितली तर लक्षात येईल की जेव्हा आपण भेंड्या खेळतो त्यात येणारी बहुतांश गाणी ही रविंची असतात.

रविंनी त्याकाळातल्या सर्वच गायक गायिकां बरोबर काम केले होते. बी आर चोप्रा, यश चोप्रा, गुरुदत्त सारख्या नामवंत लोकांसोबत त्यांनी काम केले होते. मोहम्मद रफीबरोबर केलेले काम अत्यंत विलक्षण आहे. मोहम्मद रफींचा सर्वात प्रसिद्ध गाण्यांमध्ये रविंच्या गाण्यांची संख्या खूप जास्त आहे. मोहम्मद रफींची ही गाणीचौदवीं का चाँद हो”, “तुम्हारी नज़र क्यों खफा हो गयी”, “हुस्न वाले तेरा जवाब नहीं”, “आजा तुझको पुकारे मेरा प्यार”, “छू लेने दो नाज़ुक होठों को”, “ये वादिया ये फ़िझाये”, “सौ बार जनम लेंगे”, “ये जुल्फ अगर खुल के”, “बाबुल की दुआये लेती जा”, “ झटको जुल्फ से पानी ये मोती फुट जाएंगे”, “दूर रहकर करो बात करीब जाओ”, “आज मेरी यार की शादी है”, “बार बार देखो हजार बार देखो”, “ये झुके झुके नयना”, “ये परदा हटा दो”, “नसीब में जिसके जो लिखा था”, “भरी दुनिया में आखिर दिल को समझाने कहा जाये”. ही गाणी लोकप्रिय तर आहेच आणि सर्वांना माहित पण आहे.

रफीसारखंच लतादीदींच्या प्रसिद्ध गाण्यातील खुपशी गाणी रविंनी दिलेली आहेत. “बच्चे मन के सच्चे”, “तुम्ही मेरे मंदिर तुम्ही पूजा तुम्ही देवता हो”, “मिलती हैं जिंदगी में मोहब्बत कभी कभी”, “वो दिल कहाँसे लावु तेरी याद भुलाये”, “दिल में किसी के प्यार का जलता हुआ दिया”, “गैरों पे करम अपनो पे सितम”, “लो आ गयी उनकी याद वो नहीं आए”, “लागे ना मोरा जिया सजाना नहीं आये”, “आज की मुलाकात बस इतनी” ही गाणी लतादीदींच्या लोकप्रिय गाण्यांपैकी काही गाणी.

आशा भोसलेंच्या यशस्वी कारकिर्दीत पी नय्यर, सुधीर फडके यांचे मोलाचे योगदान आहे हे आपल्याला माहित आहे. पण आशाताईंच्या यशस्वी कारकीर्दीत रविंचे पण अत्यंत मोलाचे योगदान आहे. “दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ”, “तोरा मन दर्पन कह लाये”, “हे रोम रोम में बसनेवाले राम”, “चंदा मामा दूरके”, “आगे भी जाने न तू”, “जब चली ठंडी हवा”, “निल गगन पर उड़ते बादल”, “सुन ले पुकार आयी आज तेरे द्वार”. आशाताईंची ही गाणी ऐकली तर लक्षात येईल की रविंनी त्यांच्याकडून सर्व प्रकारची गाणी गावून घेतली.

आशा भोसलेंसोबत महेंद्र कपूर यांची सुद्धा यशस्वी कारकीर्द घडवण्यामध्ये त्यांचे अत्यंत मौल्यवान योगदान आहे. “तुम अगर साथ देने का वादा करो”, “किसी पत्थर की मूरत से मोहब्बत का इरादा है”, “इन हवाओं में इन फिज़ाओ में”, “दिन हे बहार के तेरे मेरे इकरार के”, “बीते हुए लम्हों की कसक साथ होगी”, “नीले गगन के तले धरती का प्यार पले”, “चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनों”, “ये हवा ये हवा ये फिज़ा ये फिज़ा”, “आप आये तो ख़याले दिले नाशाद आया”. अश्या गाण्यांनी महेंद्र कपूरला मुख्य गायक म्हणून स्थान मिळवून दिले.

किशोरकुमारने रवि सोबत मोजकीच गाणी गायली पण ती पण लोकप्रिय झालीत. “ये रातें ये मौसम”, “हम तो मोहब्बत करेगा”, “दिल में किसी के प्यार का जलता हुआ दिया”. मन्नादा सोबत तर मला एकच गाणे सापडले. “ए मेरी जोहरा जबी तुझे मालूम नहीं” पण ह्या गाण्याने मन्नादांना एक वेगळे स्थान मिळवून दिले.

छोटा मुहं बडी बात. रविंचे संगीत अत्यंत साधे आणि सरळ होते. त्यांचा वाद्यवृंद अत्यंत सीमित पण पुरेसा असायचा. एक किंवा दोन मुख्य वाद्य असायची. त्या वेळेस असा विचार करणारी जे संगीतकार होते त्यात हेमंत कुमार, चित्रगुप्त, जयदेव ह्यांच्या रांगेत रवि येतात. गायकीचा आणि गीतकाराच्या काव्याचा प्रभाव वाद्यवृंदांपेक्षा जास्त पडेल असे संगीत रविंनी दिले. बालपणी वडिलांसोबत जे धार्मिक सत्संगामध्ये भक्तीगीत, कीर्तने आणि भजने त्यांनी गायली. तिच काय ती त्यांची संगीताची शिदोरी होती. याच शिदोरीवर रविंनी आपली संपूर्ण कारकीर्द तयार केली होती. मला तर त्याच्या कित्येक गाण्यांची चाल सारखीच वाटते. रविंनी खूप गझल तयार रचल्या. मला त्यांच्या गझलांवर भजनांचा जास्त प्रभाव दिसतो. कदाचित यामुळेच त्यांचे नाव महान संगीतकारांच्या यादीत घेत नसावे.

सिनेमाच्या संगीतकाराचे तसे स्वतंत्र अस्तित्व नसते. तो निर्माता, निर्देशक, चित्रपटाची कहाणी, चित्रपटात काम करणारे नायक, नायिका, चित्रपटाचा बजेट, चित्रपटातील गाण्याची जागा, गायक, गायिका ह्यांची सर्व बंधने संगीतबद्ध करताना येतात. रविंचा मूळ पिंड जरी भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित असला तरी रविंनी काही अजरामर फ्युजन आणि इंग्रजी चालीवर काही गाणी दिलीत. “आगे भी जाने न तू”, “बार बार देखो हजार बार देखो”, ही गाणी हिंदी चित्रपट सृष्टीतील लॅन्डमार्क फ्युजन गाणी आहेत.

अशी यशस्वी कारकीर्द सुरु असताना रविंनी अचानक हिंदी चित्रपट सृष्टीतून संन्यास घेतला. त्याची कारणं माहिती नाही. पण जेव्हा ते अजून परत आले तेव्हा निकाह सारखा दमदार चित्रपट घेऊन सलमा आगा सारख्या नव्या गायकीचे हिंदी चित्रपट सृष्टीत पक्के पाय रोवून दिलेत. “दिल के अरमा आंसुओं में बह गए” हे गाणे त्यावेळी खूप गाजले होते.

रविंनी मल्याळम चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा खूप काम केले. खरतर मल्याळम चित्रपटसृष्टीनी त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीपेक्षा अधिक पारितोषक मिळवून दिलीत.

जाता जाता रवि आपल्या मराठी चित्रपटातील अभिनेत्री वर्षा उसगावकर हिचे सासरे होत.

 

सतीश गुंडावार

मे २०२३

Friday, 21 October 2022

कांतारा - द लेजेंड

गेल्या दोन वर्षांत कोरोना सुरू झाल्यापासून चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणे फार क्वचितच. विद्यार्थीदशेत असताना चित्रपटाचे नाव माहीत नाही, सिनेमा सुरू होऊन ५ मिनिटे झालेत तरी आमच्या चित्रपट वेड्या मित्रामुळे सिनेमा बघायला गेल्याच्या बऱ्याच आठवणी आहेत. अगदी सिनेमाचे नाव मध्यांतरात कळले असेही व्हायचे. असेच काहीतरी झाले. कांतारा ह्या चित्रपटाचे नाव word of mouth ने काल कळाले. चित्रपट दक्षिण भारतीय आहे ह्या व्यतिरिक्त चित्रपटाबद्दल शुन्य कल्पना. अगदी रात्री पाऊणे दहाला तिकीट बुक केले आणि रात्री १० वाजताचा आम्ही खेळ बघायला गेलो.

चित्रपटाची कथा उडुपी, मंगलोर आणि उत्तर केरळातील तूलुनाडू भागावर आधारित आहे, दंतकथा किंवा लोककथा असावी. त्या भागातील दैव नर्तक ह्या लोककलेवर हा चित्रपट आधारित आहे. एक फार पराक्रमी आणि लोकप्रिय राजा असतो. पण त्याला जीवनात शांती नसते. एक दिवस तो जीवनात शांती शोधण्यासाठी जंगलात येतो. जंगलातील वनवासी लोकांच्या दगडाच्या देवासमोर तो येतो. चमत्कार घडावा असे त्याची तलवार खाली गळून पडते आणि त्याला शांती लाभते. तो वनवासी लोकांना त्यांचा देव मागतो. ती लोक राजाला त्याच्या बदल्यात ते जंगल मागतात. पण राजाला बजावून सांगतात की भविष्यात तूझ्या वारसदारांनी जर ही जमीन परत मागितली तर अनर्थ होईल.

पुढे आधुनिक काळात राजाचे वंशज आणि सरकारी वन विभाग ते जंगल ह्या वनवासी लोकांकडून कसे बळकावण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातला संघर्ष ही चित्रपटाची कथा!

इतकी साधी कथा असतांना सुद्धा प्रेक्षक खिळून बसतो. आपल्या सारख्या मराठी, हिंदी चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटातील एकही कलाकार माहीत नाही. मला तर अगदी १० मिनिटे नायक कोण आहे हा संभ्रम होता. एक मुळ कन्नड चित्रपट इथे हिंदीत डब करून येतो आणि ते लोकांना का आवडतं असा विचार केला तर भारतीय प्रेक्षक कसा बदलत आहे हे लक्षात येते.

बाहुबली पासून दक्षिण भारतीय चित्रपट हिंदी चित्रपट क्षेत्रात खुप चालत आहे. लालसिंग चढ्ढा सारखा अमीर खानचा चित्रपट सपाटून पडणे आणि असे चित्रपट हिट होणे हे काही संदेश देत आहे. मग तो हिंदीतील तानाजी असो की मराठीतील फर्जंद असो किंवा तेलगुतील पुष्पा असो. भारतीय प्रेक्षक ह्या मातीतील कथा शोधत आहेत. भारतीय संस्कृती, कला, परंपरा, इतिहास, आणि थोर पुरुषांवर आधारित चित्रपट लोकांना हवे आहेत. काल जितके ट्रेलर दाखवले ते तेच दर्शवत आहे. तो चित्रपटात कोण नायक नायिका आहे ते बघून आजकाल बघत नाही. चित्रपटाची किती प्रसिद्धी केली ह्यावरून पण जात नाही. कांताराची तशी काहीच प्रसिद्धी नाही. द काश्मीर फाईल सारखे चित्रपट word of mouth ने प्रसिद्ध होत आहेत.

अगदी चित्रपट संगीताचे पण तेच होत आहे. ह्या जमीनीतील संगीत असेल तरच ते लोकप्रिय होत आहे. बाहुबली, RRR, सैराट सारख्या चित्रपटांचे संगीत भव्य आहे पण भारतीय संगीतावर आहे म्हणून लोकप्रिय आहे. मी स्वतः फ्युजन संगीताचा चाहता आहे. बरेच प्रेक्षक आजही आहे. त्यामुळे धुंदाधुंद चित्रपटाचे पाश्चात्य संगीत पण लोकांना जरुर आवडते. पण भारतीय संगीत लगेच हृदयाला भिडते.

ह्या चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत हे दोन्ही कोस्टल कर्नाटकच्या लोकसंगीतावर आधारित आहे आणि भव्य आहे. असे संगीत पहिल्यांदाच ऐकले. एक मराठी लोकगीत पण चित्रपटात आहे. चित्रपटाचे नेपथ्य, वेषभुषा, चित्रीकरण, action sequences आणि शेवट अगदी बघण्यासारखे आहे.

चित्रपट किती प्रभावीपणे जनजागृती आणि विमर्श प्रस्थापित करु शकतात हे असे चित्रपट दाखवतात. कर्नाटकात हा चित्रपट तुफान लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे सरकारने ६० वर्षे वरील दैव नर्तकांना दोन हजार प्रतिमहा पेंशन घोषित केले. 

एकद जरूर बघावा असा चित्रपट आहे.

सतीश गुंडावार
२२ ऑक्टोबर २०२२


Saturday, 15 October 2022

ढापाढापी

विविधभारती हे विलक्षण रेडिओ आहे हे मी नेहमीच म्हणत असतो. आज सकाळी असेच एक सुंदर गाणं लागले होते. 'कोन हैं जो सपनों में आया।' (१९६८)
गाणे सर्वांच्या आवडीचे आहे. शंकर जयकिशन ह्यांच्या हिट गाण्यांपैकी आहे. मी माझ्या पत्नीला सहज म्हणालो की तूला माहीत आहे काय की हे गाणं एका प्रसिद्ध इंग्रजी गाण्यावर तयार केलेले आहे? एल्विस प्रेमलेच्या 'मार्गारिटा' (१९६३)
ह्या हिट गाण्यावरून 'inspiration' घेऊन केलेले आहे.

शंकर जयकिशन सारख्या प्रतिभावान संगीतकारांना अशी copy का करावीशी वाटली? व्यावसायिक अपरिहार्यता की निर्मात्यांची मागणी की वेळेचा अभाव की प्रतिभेची कमी? हे कळायला मार्ग नाही.

जरी ढापलेले गाणे असले अगदी इंग्रजी गाण्याचा भाव पण ढापला आहे तरी हे हिंदी गाणे उत्कृष्ट केले आहे ह्यात शंका नाही.

सतीश गुंडावार
१५ ऑक्टोबर २०२२