चित्रपटाची कथा उडुपी, मंगलोर आणि उत्तर केरळातील तूलुनाडू भागावर आधारित आहे, दंतकथा किंवा लोककथा असावी. त्या भागातील दैव नर्तक ह्या लोककलेवर हा चित्रपट आधारित आहे. एक फार पराक्रमी आणि लोकप्रिय राजा असतो. पण त्याला जीवनात शांती नसते. एक दिवस तो जीवनात शांती शोधण्यासाठी जंगलात येतो. जंगलातील वनवासी लोकांच्या दगडाच्या देवासमोर तो येतो. चमत्कार घडावा असे त्याची तलवार खाली गळून पडते आणि त्याला शांती लाभते. तो वनवासी लोकांना त्यांचा देव मागतो. ती लोक राजाला त्याच्या बदल्यात ते जंगल मागतात. पण राजाला बजावून सांगतात की भविष्यात तूझ्या वारसदारांनी जर ही जमीन परत मागितली तर अनर्थ होईल.
पुढे आधुनिक काळात राजाचे वंशज आणि सरकारी वन विभाग ते जंगल ह्या वनवासी लोकांकडून कसे बळकावण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातला संघर्ष ही चित्रपटाची कथा!
इतकी साधी कथा असतांना सुद्धा प्रेक्षक खिळून बसतो. आपल्या सारख्या मराठी, हिंदी चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटातील एकही कलाकार माहीत नाही. मला तर अगदी १० मिनिटे नायक कोण आहे हा संभ्रम होता. एक मुळ कन्नड चित्रपट इथे हिंदीत डब करून येतो आणि ते लोकांना का आवडतं असा विचार केला तर भारतीय प्रेक्षक कसा बदलत आहे हे लक्षात येते.
बाहुबली पासून दक्षिण भारतीय चित्रपट हिंदी चित्रपट क्षेत्रात खुप चालत आहे. लालसिंग चढ्ढा सारखा अमीर खानचा चित्रपट सपाटून पडणे आणि असे चित्रपट हिट होणे हे काही संदेश देत आहे. मग तो हिंदीतील तानाजी असो की मराठीतील फर्जंद असो किंवा तेलगुतील पुष्पा असो. भारतीय प्रेक्षक ह्या मातीतील कथा शोधत आहेत. भारतीय संस्कृती, कला, परंपरा, इतिहास, आणि थोर पुरुषांवर आधारित चित्रपट लोकांना हवे आहेत. काल जितके ट्रेलर दाखवले ते तेच दर्शवत आहे. तो चित्रपटात कोण नायक नायिका आहे ते बघून आजकाल बघत नाही. चित्रपटाची किती प्रसिद्धी केली ह्यावरून पण जात नाही. कांताराची तशी काहीच प्रसिद्धी नाही. द काश्मीर फाईल सारखे चित्रपट word of mouth ने प्रसिद्ध होत आहेत.
अगदी चित्रपट संगीताचे पण तेच होत आहे. ह्या जमीनीतील संगीत असेल तरच ते लोकप्रिय होत आहे. बाहुबली, RRR, सैराट सारख्या चित्रपटांचे संगीत भव्य आहे पण भारतीय संगीतावर आहे म्हणून लोकप्रिय आहे. मी स्वतः फ्युजन संगीताचा चाहता आहे. बरेच प्रेक्षक आजही आहे. त्यामुळे धुंदाधुंद चित्रपटाचे पाश्चात्य संगीत पण लोकांना जरुर आवडते. पण भारतीय संगीत लगेच हृदयाला भिडते.
ह्या चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत हे दोन्ही कोस्टल कर्नाटकच्या लोकसंगीतावर आधारित आहे आणि भव्य आहे. असे संगीत पहिल्यांदाच ऐकले. एक मराठी लोकगीत पण चित्रपटात आहे. चित्रपटाचे नेपथ्य, वेषभुषा, चित्रीकरण, action sequences आणि शेवट अगदी बघण्यासारखे आहे.
चित्रपट किती प्रभावीपणे जनजागृती आणि विमर्श प्रस्थापित करु शकतात हे असे चित्रपट दाखवतात. कर्नाटकात हा चित्रपट तुफान लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे सरकारने ६० वर्षे वरील दैव नर्तकांना दोन हजार प्रतिमहा पेंशन घोषित केले.
एकद जरूर बघावा असा चित्रपट आहे.
सतीश गुंडावार
२२ ऑक्टोबर २०२२