Monday, 26 October 2020

The Last Nautch Girl of Hindi Movies

जेवणात जसे लोणचे, चटणी वगैरे मुख्य खाद्य पदार्थ नसले तरी जेवण संपुर्ण होण्यासाठी ते आवश्यक असतात. तसेच हिंदी चित्रपटात असेच कित्येक पात्र अगदी छोटे असले तरी चित्रपटाच्या यशस्वी होण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. अश्या सर्व लोकांना खुप नाव, प्रसिद्धी मिळाली नाही किंवा सन्मान पण मिळाला नाही. पण त्यांचे योगदान मान्य करावेच लागेल. चित्रपट यशस्वी होण्यासाठी कथानक, कलाकार जितके महत्वाचे असतात तितकेच त्या सिनेमातले गाणी, संगीत आणि नृत्य हे महत्वाचे असतात. नृत्य हे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक मग ते धार्मिक कार्य असो किंवा सामाजिक. आपल्या भारतीय संस्कृतीत नृत्य हे आनंदाचे, स्वागताचे, विजयाचे, भक्तीचे आणि प्रेमाचे प्रतीक हजारो वर्षांपासून आहे. ते शास्त्रिय, लोकनृत्य किंवा पारंपारिकच असले पाहिजे असे नाही. ते मुक्त नृत्य पण असू शकते. भारतीय संस्कृती मुळातच लवचिक असल्याने कोणत्याही नवीन नृत्य प्रकाराचा स्विकार मुक्तपणे करणे हे भारतीयांना सहज जाते. त्यामुळे हिंदी चित्रपटाने जगातल्या सर्वच नृत्य शैली मुक्त पणे वापरलेल्या दिसतात. आत्तापर्यंत संगीतकार आणि गायकांवर काही ब्लॉग्स लिहले. म्हणून आज एका नर्तकीवर लिहावे असे वाटते.

त्या नर्तकीचे जीवन एका रोमांचक चित्रपटाला शोभेल असे आहे. दुसऱ्या महायुद्धात वडील गेल्यावर आई, भाऊ आणि बहिणी बरोबर ब्रह्मदेश ते कलकत्ता पायी प्रवास करून घराच्या गंभीर आर्थिक परिस्थितीला सांभाळणाऱ्या ह्या लहानश्या मुलीची जीवनकथाच रोमांचकारक आहे. तिच्या वैयक्तिक जीवनात डोकावण्याचा काही प्रश्नच नाही कारण reel वर बघितलेल्या लोकांचे real life बघू नये असे मला वाटते. सातशेहुन अधिक चित्रपटात काम केलेली ही नर्तकी साधारणपणे आपण खलनायिकेच्या भूमिकेत, गुन्हेगारात वावरणारी, धूम्रपान करणारी, क्लब मध्ये तोटके कपडे घालून पाश्चात्य नृत्य करतांना बघितली आहे त्यामुळे तिच्याबद्दल सकारात्मक भाव निर्माण होणे फार स्वाभाविक आहे. पण नकारात्मक विश्व हे त्या चित्रपटाच्या कथानकाचा (आणि समाज जीवनाचा) अविभाज्य आहे आणि ती ते उत्तम पद्धतीने करायची. तिचे कित्येक चित्रपटात नाव पण नाही. एक dance केला की तिचे पात्र संपले. पण मी ह्या नर्तकीकडे जरा वेगळ्याच दृष्टिकोनातून बघत आहे. ती चित्रपट यशस्वी होण्याची गुरुकिल्ली होती. जसे तिला यशस्वी करण्यात दुसऱ्यांचा सहभाग होता तसा ती कित्येक नायक, नायिका, गायिका, संगीतकार, नृत्य निर्देशक, निर्माते ह्यांच्या यशाची गुरुकिल्ली होती. तिच्या प्रत्येक नृत्यासाठी निर्माते भव्य set तयार करायचे. संगीतकार भव्य आणि नाविन्यपूर्ण संगीत करायचे. गायक, गायिका आपल्या आवाजात नवीन नवीन प्रयोग करायचे. तिने गायिका, संगीतकार ह्यांना बदलायला भाग पाडले. तिच्या स्पर्धक नर्तकी तर तिच्याबरोबर नृत्य करायची संधी शोधतच असायच्या पण त्या काळातील मोठ्या अभिनेत्री आणि अभिनेते पण तिच्यासोबत नृत्य करायची संधी कधी वाया जाऊ देत नसत. ५० ते ८० च्या दशकात तिने घातलेले ड्रेस काहींना अश्लील वाटू शकतात पण अश्लीलता ही dress मध्ये नसता बघणाऱ्याच्या डोळ्यात असते. तिचे नृत्य romantic किंवा sensual असतील पण त्यात अश्लीलता किंवा विभत्सपणा कधी दिसणार नाही. तिच्या प्रत्येक dress चे design नाविन्यपूर्ण असायचे कारण तिच्या प्रत्येक dress चे design ती स्वतः करायची. वेशभूषा, jewellery आणि makeup पण स्वतः design करायची. तिच्या प्रत्येक dance मध्ये वेगळा dress, jewellery, hair style, makeup दिसायचा. हिंदी चित्रपटात contact lenses तिनेच पहिल्यांदा आणले. एवढे सारे बदल फक्त एका नर्तकीमुळे! कदाचित ती काळाच्या फारच पुढे असल्याने तथाकथित star झाली नाही. आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल की मी कोणाबद्दल बोलत आहे. होय ती हेलन!

जसे मी आधी लिहले की हेलन यशाची गुरुकिल्ली होती. हेलनसाठी गायलेले गीता दत्त, आशा भोसले, उषा मंगेशकर ह्यांची गाणी हेलन बरोबर ह्या गायिकेंच्या यशाचे अविभाज्य घटक आहेत. सुरुवात सहयोगी नृत्यांगना म्हणून झाली पण पहिला major break “हावरा ब्रिग” (१९५८) ह्या चित्रपटात मिळाला. गीता दत्तनी गायलेले "मेरा नाम चीन चीन चु" (https://youtu.be/cQjXKdyp_wM) ह्या गाण्यातून ती दर्शकांच्या नजरेत भरली. हेलनसाठी प्रत्येक गायिकेने आवाजात नवनवीन प्रयोग केलेत. हे गाणे सुद्धा गीता दत्तच्या इतर गाण्यापेक्षा वेगळे आहे. सुरुवातीला गीता दत्त ह्यांनी हेलनसाठी बरीच गाणी गायली. उषा मंगेशकरचे हिंदी चित्रपटातील कोणते गाणे आवडते म्हटले तर लगेच "मुंगडा मुंगडा” (https://youtu.be/GKVxX1lgBmc?t=10) म्हणाल. ह्या गाण्याने उषा मंगेशकर बरोबर राजेश रोशनचे पण नाव प्रसिद्ध झाले.  आशा भोसले ह्यांनी हेलनसाठी सर्वच आघाडीच्या संगीतकारासोबत खूप गाणी गायली. नंतर तर आशाताईंचा आवाज आणि हेलनचे कॅबरे हे समीकरणच झाले. हे गाणे (https://youtu.be/s_GV9MPuj80?t=32) ऐका आणि आशाताईंनी आवाजात कसे प्रयोग केले ते ऐका. “कारवा” (१९७१) ह्या चित्रपटातील "पिया तू अब तो जा" (https://youtu.be/BbUXsytKNKk) ह्या गाण्यात RD आणि आशाताईंनी घश्यातुन आवाज काढला आहे. तसा आवाज कोणी पट्टीच्या गायकाने पण काढून दाखवावा. “अनामिका” (१९७३) ह्या चित्रपटातील "आज की रात कोई आने को हें" (https://youtu.be/GH5n_MmgXu8?t=50) आणि डॉन (१९७८) ह्या चित्रपटातील "ये मेरा दिल प्यार का दिवाना" (https://youtu.be/vIbX-eorCs4) ह्या गाण्यावर करीनाकपूरला dance करावासा वाटला. आशाताईंनी हेलनसाठी आवाजात नवनवीन प्रयोग केले. लतादिदी साधारणपणे मुख्य नायिकेसाठी गाणे गायच्या. हेलन आणि यश असे समीकरण होते की लतादिदींना सुद्धा आशाताई सारखे गायला भाग पाडले. इंतकाम (१९६९) ह्या चित्रपटातील “आ जाने जा” (https://youtu.be/XMueQRVqFBE ) दिदींनी हेलनसाठी गायले हे गाणे त्याचे उदाहरण आहे.  

हेलनने संगीतकारांना गाण्यात नवनवीन प्रयोग करण्यास, काहीतरी जगावेगळे करण्यास, संगीतात अमान्य अश्या गोष्टी करायला संधी दिली. RD आणि हेलनचे खुप गाणी प्रसिद्ध आहेत पण सचिनदा, मदन मोहन, पी नय्यर, ह्यांना सुद्धा हेलनसाठी त्यांचा नेहमीचा मार्ग सोडून वेगळ्या पद्धतीचे संगीत देण्यास भाग पाडले. सलिलदांनी केलेले "वो इक निगाह क्या मिली" (https://youtu.be/ZYr2P9ei8PI). सचिनदांनी केलेले हे गाणे "मेरा क्या सनम" (https://youtu.be/VSfxSLf4-to?t=27) ऐकल्यावर हे सचिनदांचे गाणे आहे हा विश्वासच बसत नाही. हे १९६९ चे गाणे आहे. त्यात तिचे western costume आजही modern वाटेल असा आहे आणि dance style साठी हे गाणे जरूर बघा पी नय्यर ने केलेले “हुजुरेवाला जो हो इजाजत” (https://youtu.be/-6ym4uOOtEo) saxophone वापरून केले त्यांच्या style पेक्षा थोडे हटकेच असे गाणे आहे. ह्या गाण्यात हेलनसोबत त्या वेळची प्रसिद्ध नर्तकी मधुमती आहे.

हेलन सोबत एक dance म्हणजे आपला चित्रपट यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे हे त्यावेळच्या आघाडीच्या नायिकांना पण लवकरच लक्षात आले होते. वैजंतीमाला, रागिणी, वहिदा रहमान, सायरा बानू आणि अश्या अनेक आघाडीच्या नायिकांनी तिच्या बरोबर dance केला आहे. वैजंतीमाला सोबत हे (https://youtu.be/SfC5SwIWz3M) गाणे बघा. त्या स्पर्धेत शम्मी कपूरने पण उडी घेतली आहे. भारतीय आणि परकीय नृत्याची चांगली जुगलबंदी ह्या गाण्यात आहे. हेलनने कोणाकोणाला एकत्र आणले नाही. ह्या गाण्यात लतादिदी आणि आशाताई आहेत. रागिणीच्या सोबतच्या ह्या गाण्यात (https://youtu.be/MK0JFrF5U6E) लतादिदी सोबत उषाताई आहेत. वहिदा रहमान सोबतचे हे गाणे (https://youtu.be/ni841X11GDE) बघा. तुम्ही वहिदा रहमानला पाश्चात्य कपड्यात कदाचित बघितलेच नसेल. सायरा बानू तशी आधुनिक होती पण हेलन बरोबरच्या ह्या गाण्यातला (https://youtu.be/BNYEglX41zs) तिचा western outfit तिने का घातला असेल ते तीच सांगू शकते. परवीन बॉबी सोबतचे हे गाणे (https://youtu.be/rpuRly2Hu3I) दोघींसाठी आशाताईंनीच गायिले आहे. दोघींसाठी वेगळ्या पट्टीत हे गाणे record करून नंतर मिसळले आहे. असा प्रयोग १९७५ साली पहिल्यांदाच झाला असावा. अशी जादू हेलनने केली.

तुम्हाला वाटेल की फक्त गायिकांची हेलनसाठी गायची स्पर्धा होती. तर तसे नाही, गायक पण ह्या स्पर्धेत होते. हेलनने मोहंमद रफीच्या काही गाण्यांवर dance केला आहे. गुमनाम (१९६५) ह्या चित्रपटातील "हम काले हे तो क्या हुआ" (https://youtu.be/ILgrhR9rjyM) आणि शोले (१९७५) मधील RD ने गायलेले "मेहबुबा मेहबुबा" (https://youtu.be/ByAbV-MKDgs) कोण विसरू शकते?

हेलन सर्वांनाच हवीहवीशी वाटायची. निर्मात्यांसाठी ती यशाची गुरुकिल्ली तर नायिका आणि गायिकेसाठी प्रसिद्धीची हमी. नायिकाच नाही तर कित्येक नायकांना सुद्धा तिच्यासोबत dance करण्याची इच्छा असायची. अगदी राजकुमार, राजेंद्र कुमार, मनोज कुमार, शम्मी कपूर, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, राकेश रोशन आणि संजीव कुमार ह्यांनी हेलन सोबत screen share केले आहे. मेहमूदने कदाचित हे सर्वात पहिले ओळखले असावे. ज्या मनोजकुमारांना तुम्ही कधी नाचतांना बघितले नसेल ह्या गाण्यात (https://youtu.be/CRz2HzVZd80) ते हेलन सोबत कसे नाचतांना दिसतात. हे गाणे (“वो कोन थी” (१९६४)) मदन मोहनने केले आहे. ह्या गाण्याच्या संगीताकडे बघा. म्हणजे हे गाणे मदन मोहन ह्यांच्या थाटाचे वाटत नाही. आधी लिहिल्याप्रमाणे मदन मोहन ह्यांना हेलनसाठी त्यांची style बदलायला भाग पाडले. शम्मी कपूरचे हे गाणे ५४ वर्षे जुने आहे. “तिसरी मंजिल” ह्या चित्रपटातील "ओ हसीना जुल्फो वाली" (https://youtu.be/uaTyirMKOBw) ह्या गाण्यात हेलन आणि शम्मी कपूर ज्या पद्धतीने नाचले आहे ते आजही cult dance आहे. राजेश खन्नाने तर बरीच गाणे हेलन सोबत केली आहेत. "आ वो ना गले लगाओ ना' (https://youtu.be/0HC8Vgueu0k). मजेदार आहे. हेलन समोर राजेश खन्नाने अंधाचे काम केले आहे. ह्या गाण्यातला (https://youtu.be/ivnxeBfyAZU?t=17) हेलनचा costume आणि jewellery बघा आजही modern आहेत. “द ट्रेन” (१९७०) ह्या चित्रपटातील "ओ मेरी जा मैने कहा" (https://youtu.be/wXngxdmNz2M?t=17 ) ह्या गाण्यात अजून एकदा आशाताई आणि RD हेलेनसाठी एकत्र आले आहेत आणि RD ला त्यांच्या आवाजाबरोबर नवीन प्रयोग करायची संधी मिळाली.

हेलनने फक्त कॅबरे किंवा पाश्चात्य नृत्य करायची असे समजू नका. ती प्रतिभावान नर्तकी आहे आणि वेळेनुसार बदलत गेली. तिचे सुरुवातीचे नृत्य भारतीय शैलीचे आहेत. घुंघट (१९६०) मधील "दिल ना कही लगाना' (https://youtu.be/BIM6bV251os) बघा. भारतातील बऱ्याच नृत्य शैली एकाच गाण्यात तिने करून दाखवल्या आहेत. पारसमनी (१९६३) मधील "उई उई मा ये क्या हो गया" (https://youtu.be/G94RcpKw6wk) ह्या गाण्यात तिने तिच्या नृत्यकलेची उंची दाखवली आहे. काजल (१९७५) मधील (https://youtu.be/xxDC0XXL1o0) हा मुजरा विलक्षण आहे. राजकुमारने हेलन सोबत screen share करण्याची इच्छा पुर्ण करून घेतली आहे. मोहम्मद रफीने गायलेल्या आणि रवी ह्यांनी संगीत दिलेल्या मुजाऱ्यावर हेलनने सुंदर मुजरा केला आहे.

हेलनला घडवण्यात बऱ्याच नृत्य निर्देशकांचे प्रयत्न आहेत. सुरुवातीला हर्मन बेंजामिनने तिसरी मंजील, प्रिन्स, गुमनाम सारख्या चित्रपटात तिच्याकडून उत्तम नृत्य करून घेतले. जेव्हा हेलनचा कॅबरेचा जमाना सुरु झाला तेव्हा P. L. Raj ह्यांनी तिच्याकडून खूप सारे कॅबरे करून घेतले. डॉन, शोले, इंतकाम त्यातली काही चित्रपट. वरील काही dance मध्ये P. L. Raj ह्यांना बघू शकता. पण ज्या व्यक्तीने हेलनला चित्रपट सृष्टीत आणले त्या व्यक्तीचे उपकार मानायलाच पाहिजे. कुक्कु नावाच्या नर्तकीने हेलनने हिंदी चित्रपटात नृत्य करावे आणि घराला आर्थिक आधार द्यावा हे सुचवले. कुक्कु ४०-५० च्या दशकातली हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध नर्तकी आणि first item girl of Hindi movie चा मान तिला जातो. हेलन आणि कुक्कु ह्यांचे एकत्रित नृत्य अतिशय सुंदर आहेत. चलती का नाम गाडी” (१९५८) ह्या चित्रपटातील हा मुजरा बघा (https://youtu.be/of0NHpy3t2k) आणि यहुदी (१९५८) ह्या चित्रपटातील मध्य आशियातील नृत्यावर आधारित (https://youtu.be/cI4xJCZ07zI) हे नृत्य बघा तुम्हाला नक्की वाटेल की कुक्कुने हिंदी चित्रपटाला किती मोठा हिरा मिळवून दिला.

हेलन स्पर्धेशी घाबरली नाही. तिने त्याकाळच्या प्रसिद्ध नर्तकींसोबत नृत्य केले आहे. कुक्कु, मधुमती, लक्ष्मी छाया, बेला बोस ह्यांच्या सोबत नृत्य केले आहे. हेलनला खूप स्पर्धा होती पण हेलन नेहमीच नंबर राहिली. सध्या शीला, मुन्नी अश्या item songs चा जमाना आहे. त्या गाण्यांचा चित्रपटाच्या मूळ कथेशी काही संबंध नाही. गाणी अश्लील तर आहेच पण विभत्स पण आहेत. हेलनच्या गाण्यात त्या चित्रपटातील रहस्य, कथानक पुढे नेण्यासाठी किंवा कथेचा भाग असायच्या. तिने तीस ते पस्तीस वर्षे रसिकांचे मनोरंजन केले त्यांच्या हृदयावर राज केले. ८० च्या दशकात हेलनने dance करणे बंद केले. गेल्या ४० वर्षात हेलन सारखे कोणी झाले नाही. तिची जागा कोणी घेऊ शकले नाही. हेलनला item girl म्हणणे पुर्ण चुकीचे आहे. तरी पण ती शेवटची item girl म्हणायला हरकत नाही.

 

सतीश गुंडावार

२६-ऑक्टो-२०२०