Saturday, 18 July 2020

भाई


सरस्वतीदेवीच्या सहस्रहस्ताने वरदान लाभलेल्या, मराठी माणसाच्या काळजातले ताईत असलेले प्रसिद्ध साहित्यिक श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच काहींचे फक्त पु. . तर काहींचे PL तर काहींचे भाई. आधुनिक काळातील महाराष्ट्र देशात सरस्वतीच्या काही अवतारात पु. .चे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. साहित्यकार, लेखक, व्यक्तिचित्रे, नाटककार, पटकथाकार, विनोदी वक्ते, एकपात्रीकार, मुलाखतकार, अभिनय, पेटीवादक, संगीतकार, गीतकार, आणि गायक इतक्या साऱ्या कला एकाच माणसाला सरस्वतीदेवी कशी देऊ शकते? एखाद्या माणसात एवढी विद्वत्ता किंवा एवढे अष्टपैलू गुण कसे असू शकतात?

साहित्य अकादमी आणि संगीत नाटक अकादमी ह्या दोन्ही मानाच्या संस्थेचे पुरस्कार मिळणारे महाराष्ट्रातील पुल कदाचित एकटेच. चित्रपट, आकाशवाणी आणि दूरदर्शन ह्यावर केलेली त्यांची कामगिरी. एवढे सारे कलागुण/ रूप असतांना स्वतःला मात्र तमासगीर (performer) म्हणवून घेण्यात धन्यता मानणारे पुल एक अवलिया / जिप्सीच म्हणायला पाहिजेपुलंच्या भाषेत सांगायचे झाले तर संबंध आयुष्य एखाद्या सुट्टी सारखे काढणारे पुल जिथे गेले तिथे रमले. पण एकाच ठिकाणी स्थिर राहण्याच्या स्वभावामुळे कदाचित त्यांचे इतकेसारे अष्टपैलु गुण लोकांपुढे आले. कलेतून लोकांना आनंद देण्यावर विश्वास ठेवणाऱ्या तसेच संगीत आणि खळाळून हसणे म्हणजे माणसाच्या मुक्ततेचे लक्षण मानणाऱ्या पुलंनी ह्या कोरोनाच्या महामारीत असंख्य मराठी लोकांना निखळ आनंद दिला, हसवले आहे. कोरोनाच्या lockdown मध्ये आपल्या सर्वांचे स्मार्ट फोनच्या माध्यमातून रावसाहेब, अंतू बर्वे, सखाराम, म्हैस आणि अश्या बऱ्याच पुलंच्या विनोदी प्रयोगांनी अजून एकदा मनोरंजन केले.

पुलंच्या ह्या प्रत्येक पैलूवर एक स्वतंत्र blog होईल. परंतु पुलंना ह्या गुणातील सर्वात जास्त कोणता गुण आवडत असेल? आकाशवाणीतील एका मुलाखतीत S. S. भावे ह्यांना सांगतांना ते म्हणाले, "माझ्या मनाच्या खोलीत सर्वात जास्त जागा संगीताने घेतली आहे." पुलंच्या विनोदी एकपात्री प्रयोग आणि व्यक्तिचित्रणाच्या लोकप्रियतेमुळे, पुलंचे संगीत क्षेत्रातील योगदान कदाचित मागे पडले असेल. मला वाटते की त्याची थोडी उजळणी/आठवण मराठी माणसाला करून द्यावी म्हणुन हा प्रपंच.

पुलंची १९४८ ते १९५४ पर्यंत म्हणजे फक्त वर्षे चित्रपट क्षेत्रात वाटचाल होती. त्यांचे विभिन्न योगदान असणारे २८ चित्रपट त्यात तब्बल ११ चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. चित्रपटगीता सोबतच भावगीते आणि नाट्यगीते पण पुलंनी केलीत. कदाचितच असा मराठी माणूस असेल की त्याने "नाच रे मोरा आंब्याच्या वनात" ऐकले नसेल. आशाताईने गायलेलेदेवबाप्पा’ (१९५३) ह्या चित्रपटातील https://youtu.be/Zz_UK0pfvWQ?t=6  हे बालगीत अजूनही आई मंडळीच्या ओठावर आहे. पं. जितेंद्र अभिषेकी ह्यांनी गायलेले दोन भावगीते अजूनही लोकप्रिय आहेत आणि सांगेतिक मूल्यात अती उच्च आहेत. 'शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले' https://youtu.be/xgI6O5MvXN8 आणि 'माझे जीवन गाणे' https://youtu.be/RWG6VZwwRS8 खूप वेळा ऐकले असेल पण त्याचे संगीत पुलंनी केले असेल हे जाणवले नसेलमाणिक वर्मा आणि ज्योत्स्ना भोळे ह्यांनी सुद्धा पुलंसाठी गायले आहे. 'हसले मनी चांदणे' हे माणिक वर्मांनी गायलेले भावगीत https://youtu.be/c6Vwqx5R2xA सुरेख आहे. ज्योत्स्ना भोळे ह्यांनी गायलेले 'माझिया माहेरा जा रे पाखरा' https://youtu.be/D_qm8MZbxR0 हे सध्या खूप प्रचलित नसले तरी जेव्हा झाले तेव्हा खूप लोकप्रिय होते. ही दोन्ही गाणी जरूर ऐका.

सब कुछ पुल असलेल्या १९५४ साली प्रदर्शित झालेल्या "गुळाचा गणपती" हा अतिशय लोकप्रिय चित्रपट. त्यात पुलंनी अभिनयापासून ते संगीतकार पर्यंत सर्व काम केले आहेत. ह्या चित्रपटातील सर्वच गाणी उत्तम आहेत. इथे काहीच देत आहे. पण तुम्ही सर्व गाणी आवर्जुन ऐका. ह्या चित्रपटाची मोठी देण म्हणजे पं. भीमसेन जोशी ह्याचे लोकप्रिय भजन 'इंद्रायणी काठी देवाची आळंदी' https://youtu.be/tbXsqtxsea4 , 'शाम घुंगट पट खोले' https://youtu.be/l2qxLIQCxZc माणिक वर्मांनी गायलेले ठुमरी थाटातील हे गाणे तुम्हाला नक्कीच आवडेल. आशाताईनी गायलेले "इथेच टाका तंबु' https://youtu.be/JYKKntD2_o0 , तसेच वसंतराव देशपांडे सोबत गायलेले 'ही कोणी छेडली तार' https://youtu.be/46384SEH8Bw ही दोन्ही गाणी श्रवणीय आहेत. ह्या गाण्यात गिटार अभिनव पद्धतीने वापरले आहे. आशाताईंचे ‘देवबाप्पा’ चित्रपटातील "करू देत श्रुंगार सख्यांनो' https://youtu.be/zrfw44ebHno हे गाणे आशाताईने फारच गोड गायले आहे

स्वतः पुलंनी काही नाट्यगीते आणि भावगीते गायले आहेत. सहसा ऐकली नाही पण ही गाणी त्यांच्या गायकीची ताकद नक्कीच दाखवते. ‘बाई या पावसानेhttps://youtu.be/ZB790ugPdSQ हे कवी अनिल ह्याचे गीत. ‘पाखरा जा त्यजुनिया प्रेमळ शितल छायाhttps://youtu.be/Z8Z7_53FFVU आणि ‘ललना कुसुम कोमलाhttps://youtu.be/WN7cXmFsIEY ‘वहिनी’ ह्या नाटकातील ही दोन नाट्यगीत फारच अवीट आहेत. ‘जा जा ग सखी जाऊन सांग मुकुंदाhttps://youtu.be/vHJG7uFDUmc हे 'कुबेर'(१९४७) चित्रपटातील गाणे पण सुरेल आहे. पुलंच्या गाण्याची "माझे जीवन माझे गाणे' नावाची एक ध्वनिफित सारेगामा HMV ने काढली आहे. ह्या blog मधील काही गाणी त्या ध्वनिफितीत आहेत.

पुलंनी संवादिनी (पेटी)चे रीतसर शिक्षण घेतले होते पण शास्त्रीय संगीताचे तसे काही प्रशिक्षण घेतले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या संगीत प्रतिभेच्या मर्यादा कदाचित समजल्या असतील. ते एकदा म्हणाले वसंतरावांच्या गायनानंतर मी मनाचे श्लोक म्हणण्यासारखे आहे. त्यात त्यांचा सहवास अभिषेकी, भीमसेन जोशी, वसंतराव ह्यांचा सारख्या दिग्गज मंडळींसोबत असल्याने त्यांनी पण कबुल केले होते की त्यांची संगीतातली उंची गाठू शकत नाही. १९५४ च्या 'गुळाचा गणपती' नंतर काही तरी घडले असावे असे वाटते. ज्यामुळे भाईंनी चित्रपट क्षेत्र आणि त्यातले संगीत क्षेत्र कदाचित सोडले असावे. परंतु पेटी वादक म्हणुन वसंतराव, भीमसेन जोशी सोबत पुढील अनेक वर्षे लोकांनी त्यांना बघितले आहे.

पुल सारखे दुसरे व्यक्तिमत्व होणे नाही. अश्या बहुमुखी, बहुआयामी, अष्टपैलु ‘तमासगीराला’ माझा मानाचा मुजरा!

सतीश गुंडावार

१८-जुलै-२०२०