Tuesday, 16 June 2020

माझी स्टेट बँक

काही दिवसांपुर्वी माझ्या मुलीचा मला फोन आला. 'बाबा, मी माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर चालली आहे. सिनेमा बघणार, थोडे shopping करणार आणि नंतर पिझ्झा वगैरे खाणार. पैसे संपले आहेत, लगेच transfer करा' मी लगेच पैसे transfer केले. ह्या सर्व गोष्टी आता सहज वाटतात आणि तंत्रज्ञानाने ह्या सर्व गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पैसे transfer करतांना मी माझ्या भुतकाळात सहज गेलो. अकरावी ते इंजिनीरिंग पर्यंत म्हणजे वर्षे घराबाहेर राहिलो. पैसे संपलेत असे अनेक प्रसंग.

आज प्रशांतचा वाढदिवस आहे. सहज बोलतांना मी म्हणालो माझी की 'स्टेट बँक'! १९८६ मध्ये कराडला इंजिनीरिंगला नुकताच प्रवेश घेतला होता. पवनी ते कराड हे अंतर खूप असल्याने college सुरु व्हायचे होते तरी तिथेच वसतीगृहात थांबलो होतो. इतक्यात एक तार आली. बाबांनी ती पवनी वरून कराडला redirect केली होती. बंगलोरला नौदलाच्या इंजिनीरिंग कॉलेजची परीक्षा होती. कराड वरून बंगलोरला जाणे, तिथून परत पवनीला जाणे ह्यासाठी पैश्याचे नियोजन केले नसल्याने तेवढे पैसे नव्हते. आता काय करायचे? बंगलोरला जाणे रद्द करायचे? तसाही इंजिनीरिंगला प्रवेश मिळाला होता. मनात सैन्य दलात काम करण्याची इच्छा पण होती. मग ठरवले की नौदलाच्या परीक्षेला जायला पाहिजे पण पैसे नव्हते.

प्रशांतसोबत ओळख होऊन - दिवसच झाले होते. मी प्रशांतला माझी अडचण सांगितली आणि ५०० रुपये मागितले. प्रशांतने ते लगेच दिलेत. त्यावेळी इंजिनीरिंगच्या प्रवेशांचे बऱ्याच फेऱ्या व्हायच्या त्यामुळे कॉलेज बदलायचे, नौदलाच्या परीक्षेला जात होतो, तिथेपण निवड होऊ शकते. थोडक्यात, मी कदाचित कराडला परत येणार पण नाही अशी एक शक्यता होती. हा परत आला नाही तर आपले ५०० रुपये बुडणार ह्याची प्रशांतला नक्की कल्पना असणार. पण त्याने त्याचा विचार न करता मला लगेच पैसे दिलेत. मी बंगलोरला गेलो, परीक्षा दिली. प्रारब्धात कराडच होते त्यामुळे पुढील चार वर्षे कराडात गेली. 

९० पर्यंत STD चा विशेष प्रसार झाला नव्हता, घरोघरी फोन पण आला नव्हता. त्यामुळे पत्र हेच संवादाचे माध्यम. कराड मध्ये शिकणाऱ्या विदर्भातील विद्यार्थ्यांना स्टेट बँकेच्या MT ने पैसे यायचे. वर्षात २ ते ३ वेळा MT यायला नक्की उशीर व्हायचा. गरजेपुरते मोजकेच पैसे असल्याने MT उशीरा आली की पैसे उधार मागावे लागायचे. माझ्यासाठी प्रशांत हे पैसे मागण्याचे हक्काचे स्थळ. त्या चार वर्षात त्याला कितीवेळा पैसे मागितले असतील ह्याचा हिशोब नाही. त्याने पण कधीच आढेवेढे घेतले नाही. म्हणुन तो कॉलेज मध्ये असतांना माझी ‘स्टेट बँक’ होता आणि अजूनही आहे. जीवनात असे काही ऋण असतात की ते कधीच फेडले गेले नाही पाहिजेत असे वाटते. प्रशांतच्या ह्या ऋणात जन्मभर राहणार आहे.

आज त्याचा वाढदिवस आहे. ह्याच नेमक्या भावना आज आहेत. त्याला उदंड आयुष्य लाभो, त्याचा हा दातृत्व गुण अधिकाधिक वृद्धींगत होवो हीच प्रभुचरणी प्रार्थना!!!