Sunday, 24 May 2020

रवींद्र जैन

मनाच्या असंख्य नेत्राने बघणारा हा अवलिया एखाद्या डोळस व्यक्तीपेक्षा खोलवर दृष्टि घेऊन ह्या जगात आला. हिंदी चित्रपट सृष्टीत एकमेकांना स्पर्धक असे गुण एकाच व्यक्तीत असणे दुर्मिळ पण ते समर्थपणे पेलणे त्याहूनही कठीण. असे अनेक उदाहरण आहेत की एकाच कलेवर, कौशल्यावर लक्ष केंद्रित करून इतर गुणांना जरा मागे ठेवले गेले पण रवींद्र जैन म्हणजेच दादू हे त्याला अपवाद. संगीतकार, गीतकार आणि गायक ह्या सर्व आघाडीवर आपली छाप टाकणारे दादू कदाचित एकटेच. कमीतकमी वाद्याचा वापर, त्यात मुख्यतः भारतीय वाद्यांचा जास्त वापर आणि गायकीला अधिक प्राधान्य देणारे मोजकेच संगीतकार हे हिंदी चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळात होते त्यापैकी दादू हे एक श्रेष्ठ नाव नक्कीच आहे. मुळचे अलिगढ म्हणजे उत्तरप्रदेशातले त्यामुळे उर्दु, हिंदी आणि संस्कृत साहित्याचा एकत्रित प्रभाव, लहानपणापासुन भारतीय शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास, तसेच वडिलांपासून आणि थोरल्या भावापासून घेतलेली साहित्याची आसक्ती, प्रचंड स्मरणशक्ती, जीवनातील महत्वाचा काळ कलकत्त्यात म्हणजे बंगालच्या धरतीवर, त्यात रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या साहित्याचा आणि संगीताचा प्रभाव असे मिश्रण मिळणे हे आधुनिक काळात कदाचित अशक्यच.

दादूने संगीत दिलेले जवळपास सर्व गाणी स्वतःच लिहली आहेत. हे विशेष कसब आणि योगदान म्हणता येईल. दादूने बऱ्याच नावाजलेल्या निर्माता / दिग्दर्शकांसोबत काम केले त्यात राजकपूर, बी. आर. चोप्रा, शक्ती सामंत, एन. एन. सिप्पी आणि राजश्री प्रोडक्शन ही विशेष नाव. त्यात राजश्री प्रोडक्शन हे नाव विशेष घ्यावे लागेल. त्यांच्या बहुतेक चित्रपटाला दादूने संगीत दिले आहे अगदी अलीकडचा असा "विवाह" हा चित्रपट सुद्धा.  इथे एक विशेष बाब लक्षात देण्यासारखी आहे. त्यांची राजश्री प्रोडक्शन आणि राजकपूर ह्यांचीच गाणी प्रसिद्ध झालीत. कदाचित ह्या हिऱ्याला तश्याच जोहरीची गरज असणार.
दादूने इतक्या नवोदित गायकांना संधी दिली की काही गायकांचे गाणे रेडिओवर लागले तर ते नक्की दादूने संगीत दिले असणार असे गृहीत धरू शकता. मी हे दादूंचे हिंदी चित्रपट सृष्टीला सर्वात मोठे योगदान मानतो.  मला कमालीचा आवडणारा गायक म्हणजे येशुदास. येशुदास आणि दादू हे मिश्रण दैवी आहे. येशुदास म्हटले की 'चितचोर' हा चित्रपट आठवतो. त्यातील 'जब दीप जले आना, जब शाम ढले आना' हे यमन रागातील गाणे https://youtu.be/11yh-UCeev4 अप्रतिम आहे. तू जो मेरे सूर में सूर मिला दे’ https://youtu.be/U06da2bGzys  हे गाणे त्याच्या गायकी, शब्द आणि साधेपणाने श्रीमंत झाले आहे. इतर गाणी 'गोरी तेरा गाव बडा प्यारा मैं तो गया मारा', आज से पहले आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली' ही गाणे खूप लोकप्रिय आहेत. तसेच 'खुशीया ही खुशीया हो दामन में जिसके' https://youtu.be/KkEAcSngyao तसे आधुनिक वाद्यवृंदाने केलेले गाणे ह्यात बंगालची लोकप्रिय गायिका बनश्री सेनगुप्ता हिने काही ओळी गायल्या आहेत. असे चिरकाळ आठवणारे येशुदासची गाणी ही दादूंचीच.  

अजून अशीच गायिका म्हणजे आरती मुखर्जी म्हणजेच दादूंची आरतीदिदी. 'मैं वही दर्पण वही' https://youtu.be/U2UIzKcOT1k हे 'गीत गाता चल' ह्या चित्रपटातील सारिकावर चित्रित केलेले हे हलके फुलके गाणे. त्याच चित्रपटातील 'शाम तेरी बंसी पुकारे राधा नाम' हे भक्ती गीत. https://youtu.be/XJqKbDxAa3U दादूचे एक वैशिष्ठ होते की त्यांनी गाण्यात प्रेमरसात श्रुंगाररस भरतांना भक्तीरस पण भरला आहे. कदाचीत त्या पिढीला अनुरूप असे मिश्रण असले तरी आधुनिक स्त्री जी पुरुषाइतकीच कर्तबगार, यशस्वी आणि तिने स्वतःचे स्वतंत्र स्थान समाजात निर्माण केले असल्याने तिच्या पती प्रेमात किंवा प्रियकराच्या प्रेमात अशी भक्ती असणे तसे कालबाह्य झाले आहे. 'दो पंछी दो तिनके' हे ‘तपस्या’ ह्या चित्रपटातील किशोरकुमार बरोबर गायलेले आरती मुखर्जीचे गाणे सुंदर आहे.

असाच एक पडद्यामागे गेलेला गुणी गायक जो सचिनचा आवाज होता तो म्हणजे जसपालसिंग. 'गीत गाता चल' आणि 'नदिया के पार' ह्या सचिनच्या लोकप्रिय चित्रपटात सचिनचा आवाज जसपालसिंगचा. 'गीत गाता चल साथी' https://youtu.be/w-OIilgyibQ. 'कोन दिसा में लेके चला रे बटोहीया' https://youtu.be/JBQca5DEQeQ ही गाणी गाजली पण जसपालसिंगचे नाव काही झाले नाही. शैलेंद्रने 'पुरवैय्या लेके चली मेरी नैय्या' हे लतादिदी सोबत गायलेले गाणे फारच सुरेल आहे. येशुदास, आरती मुखर्जी, जसपालसिंग ह्यांच्या बरोबर अजून एक गायिका म्हणजे हेमलता ह्या दादूंच्या core team च्या सभासद. दादूंनी हेमलता कडून खूप गाणी गावुन घेतली. वरील काही गाण्यात सहगायिका म्हणून त्या आहेत पण त्यांची काही प्रसिद्ध गाणी म्हणजे 'अखियों के झरोकोसे मैने जो सावरे' https://youtu.be/KqpIIaCJggY  'ले तो आये हो हमे सपनो के गाव में' https://youtu.be/ThUWdFnFxrs हेमलता ह्यांना लतादिदींचा पर्याय म्हणून वापरला गेला. तो तसा असु शकत नाही पण ही तुलना हेमलतावर अन्याय आहे.
जसे दादूंच्या प्रेमगीतात भक्तीरस आहे तसेच त्यांच्या बऱ्याच इतर गाण्यांमध्ये जीवनाचे तत्वज्ञान आहे. त्यामुळे त्यांचे प्रत्येक गाणे मन लावून ऐकावे लागते. किशोरकुमार ह्यांनी गायलेले 'जो राह चुनी तुने उसी राह पें राही चलते जाना रे' https://youtu.be/XyZhsA3h-vU  हे गाणे पुर्ण ऐका. गाणे राखी वर चित्रीत केले आहे पण आवाज किशोरकुमारचा. त्या गाण्यात पुढे 'कभी पेड का साया पेड के काम ना आया' आणि 'कोई कितने ही फल तोडे उसे तो हे फलते जाना रे' म्हणजेच साध्या भाषेत ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ सांगितले आहे. 'सुनके तेरी पुकार संग चलनेको तेरे कोई हो ना हो तैय्यार' https://youtu.be/MfyI1XAwwbA हे ‘फकिरा’ ह्या चित्रपटातील महेंद्रकपूर ह्यांनी गायलेले गाणे म्हणजे 'एकला चलो रे' सांगणारे आहे. पुढे ह्या गाण्यात पुढे तत्त्वज्ञानाने भरलेल्या खूप चांगल्या ओळी (तू तो लाया रे अकेला गंगा धरती पे उतार) आहेत.

किशोरकुमार, आशा ताई, मोहम्मद रफी, मुकेश आणि लतादिदी ने सुद्धा दादूंसोबत बरीच गाणी गायली आहे. रफींचे 'नजर आती नही मंजील'  https://youtu.be/PwlI5-eqEcA हे त्यांच्या सुरुवातीच्या काळातले गाणे आहे. आशाताईने गायलेले 'साथी रे भुल ना जाना मेरा प्यार' https://youtu.be/8m3nU_PlA5o, हे गाणे फक्त ऐका बघु नका J किशोरकुमार आणि आशाताईने गायलेले 'ले जायेंगे ले जायेंगे दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'  https://youtu.be/K0_jpigjv1c हे उडत्या चालीवरचे गाणे आपण ऐकलेच आहे. ह्यातील काही शब्दावर पुढे चित्रपटाचे नाव ठेवले गेले!
९० च्या दशकामध्ये हा हिरा राजकपूरच्या हाती लागला आणि 'हीना' आणि 'राम तेरी गंगा मैली हो गयी' हे दोन संगीत प्रधान चित्रपट दादूंनी राजकपूर बरोबर केलीत. लतादिदी आणि सुरेश वाडकर ह्यांची अप्रतिम गाणी ह्या दोन चित्रपटात आहेत. लतादिदीने गायलेले 'इक दुखियारी कहे बात ये रोते रोते राम तेरी गंगा मैली हो गयी पापियोके पाप धोते धोते' https://youtu.be/hwo8lprGeFI ह्या ओळीने राजकपूरच्या हा चित्रपटाचे नाव ठेवण्याच्या द्विधा मनः स्थितीतून बाहेर काढले कारण राजकपूरने 'जिस देश में गंगा बहती है' हा चित्रपट पण केला होता. गाण्याची सुरवात अप्रतिम सारंगी ने होते. ह्या गाण्यातील एक एक वाक्य समाजाच्या सद्य स्थितीवर चपराक आहे. 'नदी और नारी रहे औरोका कलंक सर ढोते'. 'इक राधा इक मीरा' https://youtu.be/tcuWwBKWy0U हे गाणे चित्रपटात मुजरा आहे. पण दादूंची कमाल की त्यात पण भक्तीरसाचे मिश्रण केले आणि मुजरा पण पवित्र झाला. त्या गाण्यात एक ओळ आहे 'इक जीत ना मानी, इक हार ना मानी'. असे चित्रपट गीत असून उच्च दर्जाचे गीत आहे. 'हीना' चित्रपटातील 'मै हूं खुश रंग हीना' https://youtu.be/l6YgQj9HHsw  त्यात एक ओळ आहे 'प्यार ही मेरी जुबा प्यार ही मेरी चलन' सांगायचे म्हणजे दादूंनी लिहलेले प्रत्येक गाणे लक्ष देऊन ऐकावे लागते. सुरेश वाडकर ह्यांनी गायलेले  मुझ को देखो गे जहा तक मुझ को पाओ गे वहा तक' हे typical राजकपूर गाणे आहे. https://youtu.be/BKn4bs_92aA

जाताजाता दादूंनी गायलेले गाणे सांगितले नाही तर हा लेख अपुर्ण राहील. 'जाते हुए यह पल छीन क्यों जीवन लिए जाते'   https://youtu.be/t5gNlQ2GTZ4 हे गाणे जरूर ऐका. त्यांच्या आवाजातला दर्द काळजाला लागतो. कोरोना blockdown ने सर्वांना 'रामायण', 'कृष्णा' ह्या सारख्या अत्यंत लोकप्रिय धारावाहिक अजून बघायचा योग आला. अश्या अनेक धार्मिक धारावाहिकांना दादूंचे संगीत आहे. रामायणातील त्यांच्या आवाजातील दोहे, चौपायी, भजन ह्याचा समाज मनावर खोल परिणाम झाला आहे. अश्या चतुरस्र कलाकाराच्या 'आंख खुल जाये आंख वालोकी' योगदानाची धावती ओळख.

सतीश गुंडावार
२४-मे-२०२०