Friday 21 February 2020

श्रीकांत ठाकरे

होय ठाकरेच! आज अश्याच एका अवलिया मराठी संगीतकारावर लिहायचा मूड झालाय. ठाकरे म्हटले की शिवसेना आणि बाळासाहेब डोळ्यासमोर येतात. होय त्याच पैकी म्हणजे बाळासाहेबांचे धाकटे बंधु आणि मनसेचे राज ठाकरे ह्यांचे वडील म्हणजे श्रीकांत ठाकरे! प्रबोधनकार ठाकरे ह्यांच्या साहित्य, कला आणि संगीत ह्याचा सुंदर वारसा पुढे नेणारे श्रीकांतजी. रेडिओवर कधी मोहम्मद रफ़ी किंवा शोभा गुर्टु ह्यांचे मराठी गाणे लागले तर हे गाणे श्रीकांत ठाकरेंचे असावे असा पहिला अंदाज बांधावा. त्यात रफींचे असेल तर संगीत श्रीकांत ठाकरेंचेच असणार.

रफ़ीना मराठीत गावुन घेण्याचे पूर्ण श्रेय श्रीकांत ठाकरेंना जाते. पण त्यांचे मोठेपण ह्यातच नाही. अभिजात मराठी गाण्यात उत्तर भारतीय संगीत थाट, उर्दू आणि हिंदी शब्दांचा मुक्तपणे वापर, ठुमरी, कव्वाली आणि गझल ह्याचा उत्तम वापर करण्याचे पुर्ण श्रेय त्यांना जाते. मराठी गाण्याच्या सुवर्णकाळात त्यांची गाणी संपुर्ण वेगळी आणि अद्वितीय आहेत. गाण्यातील वाद्यसंच सुद्धा आगळावेगळा आहे. त्यांनी सतार, सारंगी, व्हायोलिन, मेंडोलिन, बुलबुलतरंग अश्या तंतु वाद्यांचा विलक्षण मेळ घातला. त्यांनी रफींकडून भावगीते, भक्तीगीते, मराठी गझल, कोळीगीते गावुन घेतलीत. 'शोधिशी मानवा राऊळी मंदिरी', 'प्रभु तू दयाळु', 'खेळ तुझा न्यारा' ही भक्तीगीते आपल्या ओठावर आहेत. रफींनी अवीट भावगीते मराठीत श्रीकांतजींकडे गायली आहेत. 'हे मना आज कोणी' अतिशय अप्रतिम आहे. श्रीकांतजींने रफींकडून प्रेमगीते कव्वाली थाटात गावुन घेतली आहेत. 'हा रुसवा सोड सखे', 'हा छंद जीवाला लागे पिसे' ही गाणी नक्की ऐका. गाण्यात उर्दू आणि हिंदी शब्दांचा मुक्त वापर केला आहे. रफी पंजाबी असून सुद्धा त्यांच्याकडून '', '', '', '', '', '', '' ह्या अक्षरांचा उच्चार अगदी अस्सल मराठी माणसासारखा काढून घेतला. असे ऐकले की रफींना मराठी '' स्पष्ट उच्चारता येत नव्हतं म्हणुन श्रीकांतजींनी आपल्या गीतकारांना '' वापरण्याचा सल्ला दिला होता. रफींनी गायलेली मराठी गझल 'विरले गीत कसे' हे जरूर ऐका. 'अग पोरी संबाल दर्या...' हे कोळीगीत सर्वांचे आवडीचे आहेच आणि हे बालगीत 'प्रकाशातील तारे तुम्ही ..... हसा मुलांनो हसा' आपण कित्येकदा ऐकले असणार. रफींनी मोजकेच मराठी गाणी गायली. परंतु मला खात्री आहे की श्रीकांतजींने केलेल्या गाण्यांनी त्यांना अत्यंत समाधान दिले असणार. 
श्रीकांतजींनी खूप साऱ्या गायकांकडून गावुन घेतले. शोभा गुर्टू आणि दिलराज कौर ह्यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. अश्या गायिकेंचा वापर मराठी गाण्यात फक्त श्रीकांतजी सारखे श्रेष्ठ संगीतकार करू शकतात. शोभा गुर्टू ह्यांचीमाझिया प्रियाला प्रीत कळे ना', 'उधड्या पुन्हा जहाल्या' ह्या ठुमरी थाटातील गाणे आपण खूपदा ऐकली आहे. त्यांची 'अधीर याद तुझी जाळीतसे', 'त्यांनीच छेडले गं' ही गाणी पण अप्रतिम आहेतमला विशेष उल्लेख दिलराज कौर ह्यांची 'सांग ना कुठे जाऊ', आणि 'भेट ती तुझी झाली' ह्या गाण्यांचा करावासा वाटतो. संगीत प्रेमींना जरूर आवडतील अशी सुंदर. 

मराठी गाण्यांच्या अमुल्य साठ्यात श्रीकांत ठाकरेंचे एक वेगळे योगदान आहे. त्यांनी केलेली गाणी त्यावेळी सुद्धा अद्वितीय होती आज पण आहेत. त्यांच्या संगीत थाटणीची पद्धत त्यावेळी पण क्रांतिकारक होती. ठाकरे घराण्याचे आगळेवेगळे पण त्यांच्या संगीतातपण दिसून येते. श्रीकांतजी उत्तम संगीतकार असतांना श्रेष्ठ पत्रकार, व्यंगचित्रकार पण होते. धाकट्या भावाचे आदर्श उदाहरण म्हणायला काहीच हरकत नाही. बाळासाहेबांच्या राजकीय कारकिर्दीत आणि पत्रकारितेत श्रीकांतजींचा पडद्या मागुन सिंहाचा वाटा होता. पण मला असे वाटते की संगीत त्यांचे पहिले प्रेम असावे म्हणून पत्नीचे नाव मधुवंती, मुलीचे नाव जयजयवंती तर मुलाचे नाव स्वरराज (म्हणजेच राज) असे ठेवले. श्रीकांतजी मराठी संगीतातले एक दीपस्तंभ आहेत आणि येणारी पिढी जेव्हा मराठी सुगम संगीताचा अभ्यास करतील तेव्हा त्यांना श्रीकांतजी नक्कीच एक नवीन दृष्टी देतील.

हा ब्लॉग जर समजा राज ठाकरे पर्यंत पोहचला तर माझी त्यांना एक आग्रहाची विनंती असेल की त्यांनी श्रीकांतजींना समर्पित एक संकेतस्थळ तयार करावे आणि त्यात श्रीकांतजींने जो खजिना सोडून गेलेत तो त्यात टाकावा. येणाऱ्या पिढीला त्यातुन खूप प्रेरणा मिळेल.

सतीश गुंडावार
२१-फेब्रु-२०२०